बेळगाव लाईव्ह: मंत्री डी. के. शिवकुमार यांच्या गुंडानीच बेंगलोर येथील माझ्या घरावर अश्लील पोस्टर्स चिकटवले आहेत, असा आरोप गोकाकचे आमदार माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केला आहे.
बेळगाव शहरात शासकीय विश्रामधाम येथे आज मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी राज्याचे मंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर कडाडून टीका केली. काल रात्री डी के शिवकुमार यांनी आपल्या गुंडांना पाठवून माझ्या बेंगलोर येथील निवासस्थानावर अश्लील पोस्टर्स चिकटवले आहेत. हे कृत्य करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते नव्हते तर शिवकुमार यांचे गुंडच होते असा आरोप त्यांनी केला.
अश्लील सीडी प्रकरणात अवमान झालेली त्यांच्यासारखी व्यक्ती काहींही करू शकते. त्या विरोधात मी गोकाक पोलिसात तक्रार नोंदविली आहे. गोकाक येथील तक्रार बेंगलोर पोलिसांकडे वर्ग करून त्याबद्दल मी कायदेशीर लढा लढणार असून सीडी प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी आपण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे, त्याचप्रमाणे सदाशिवनगर येथील प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी गृहमंत्री आणि डीजीपीआय यांना पत्र लिहून केली असल्याची माहिती जारकीहोळी यांनी दिली.
गृहमंत्र्यांच्या सीडीमध्ये देखील डी. के. शिवकुमार यांचा हात आहे आणि जर तसे नसेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे असे देखील ते यावेळी म्हणाले. रमेश जारकीहोळी यांना मी संपविले आहे अशी दर्पोक्ती करणारा त्यांचा ऑडिओ माझ्याकडे आहे. त्याची देखील सीबीआय चौकशी होणे आवश्यक असून सीबीआय चौकशीसाठी आवश्यक सर्व पुरावे माझ्याकडे आहेत असे त्यांनी सांगितले. डी. के. शिवकुमार हे कमकुवत व्यक्ती असून ब्लॅकमेल करणे हे त्यांचे काम आहे. त्यांची ‘सीडी फॅक्टरी’ बंद होण्यासाठी हा तपास सीबीआयकडे गेलाच पाहिजे असा देखील घणाघात त्यांनी केलाय.
उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये डी. के. शिवकुमार दोषी आहेत हे मी सिद्ध करू शकतो, असा विश्वास जारकिहोळी यांनी व्यक्त केला जर सीडी प्रकरण सीबीआय कडे सोपवले तर आणखी कांही खळबळजनक प्रकरणे उघडकीस येतील. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करणार आहे.
गेल्या चार वर्षापासून मी अपमान सहन करत आलेलो आहे. आता मी पुरावे देतो अन्यथा आमदार पदाचा राजीनामा देतो. डी के शिवकुमार पर्वाचा अस्त झाल्यास ते राजकीय क्षेत्रासाठी उत्तम व हिताचे ठरणार आहे. सोनिया गांधी यांच्याबद्दल ते काय बोलले आहेत त्याचा व्हिडिओ देखील आपल्याकडे असल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.