Sunday, January 5, 2025

/

ऑस्ट्रेलियात जाऊनही ‘याने’ जपली आपली संस्कृती, परंपरा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावसह देशभराप्रमाणे परदेशात गेलेले भारतीय देखील आपली संस्कृती व परंपरा न विसरता श्री गणेशोत्सव साजरा करत असतात. माजी उपमहापौर रेणू किल्लेकर व सुहास किल्लेकर यांचा सुपुत्र गुरुराज हा त्यांच्यापैकीच एक आहे. ऑस्ट्रेलियात असलेल्या गुरुराज आणि त्याच्या मित्रमंडळींनी श्री गणेशोत्सव उत्साहात साजरा केला.

उच्च शिक्षणासाठी गुरुराज सुहास किल्लेकर हा मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथील जीलॉंग प्रांतात वास्तव्यास आहे. गुरुराज हा तेथील डिकीन विद्यापीठामध्ये मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम शिकत आहे.

गुरुराजप्रमाणे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील काही मुलं-मुली त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. हे सर्वजण एकाच होस्टेलमध्ये राहत असल्यामुळे त्यांच्यात घट्ट मैत्री झाली आहे.

परदेशात गेले असले तरी आपली संस्कृती व परंपरा न विसरलेल्या गुरुराज आणि त्याच्या मित्र-मैत्रिणींनी श्री गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. श्री गणेश चतुर्थी दिवशी या सर्वांनी छान नवे पोशाख परिधान करून विद्येची देवता असलेल्या श्री गणेश मूर्ती हॉस्टेलमध्ये आणून तिची विधिवत प्रतिष्ठापना केली.Ganesh

त्यानंतर गुरुराजसह गायत्री गाडे, साहिल कराड, श्लोक कुंभार, आयुष्य झिंजुर्डे, कौस्तुभ भोईर, भक्ती राव, आकाश गोयल, आदित्य भंडारी आणि जानव्ही या त्याच्या मित्र-मैत्रिणींनी दीड दिवसाच्या आपल्या बाप्पाची आरती म्हणून स्तोत्र पठण करून मनोभावे सेवा केली.

अखेर या सर्वांनी बाप्पाचा आशीर्वाद घेऊन जड अंत:करणाने त्याला निरोप दिला. गुरुराज आणि त्याच्या मित्रमंडळींनी जीलॉंग येथील समुद्रकिनारी जाऊन श्री गणेशाचे विसर्जन केले. गुरुराजने आपण ऑस्ट्रेलियात साजरा केलेल्या गणेशोत्सवाचे व्हिडिओ आणि फोटो आपले आई -वडील आणि बेळगावातील मित्रमंडळींना धाडले असून सर्वांमध्ये त्याचे कौतुक होत आहे.

 

‘या’ कुटुंबाने अमेरिकेत साजरा केला श्री गणेशोत्सव

आपल्या देशाप्रमाणे अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय देखील श्री गणेशोत्सव उत्साहात साजरा करत असून त्या अनुषंगाने डलास येथे असलेल्या जांगळे कुटुंबीयांनीही आपला सार्वजनिक श्री गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला.

बेळगावातील मराठी नाटकांचे वितरक अनंत रामचंद्र जांगळे यांचे दोन्ही चिरंजीव अनुक्रमे अभिजीत आणि सुशांत हे दोघेही सपत्नीक आपल्या मुलांसह अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील डलास गावात स्थायिक झाले आहेत. बेळगावतून 20 वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलेले अभिजीत अनंत जांगळे हे बँकेमध्ये तर त्यांचे लहान बंधू सुशांत हे नेसले कंपनीत काम करतात. डलास येथील हिंदू समुदायातर्फे दरवर्षी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मोठ्या हर्षोउल्हासात साजरा केला जातो. त्यामध्ये बेळगावचे जांगळे कुटुंबीय देखील आवर्जून हजेरी लावत असतात.

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील डलास येथील हिंदू समुदायाने तेथील श्री हनुमान मंदिरामध्ये दीड दिवसाचा सार्वजनिक श्री गणेशोत्सव उत्साहात साजरा केला. बाप्पाचे स्वागत, प्रतिष्ठापना, पूजा, आरती या सर्वांमध्ये जांगळे कुटुंबीयांसह समस्त हिंदू बांधवांनी भक्तीभावाने सहभाग दर्शवला होता. श्री गणेशाचा विसर्जन सोहळाही जल्लोषात पार पडला. यावेळी छ. शिवाजी महाराज आणि बाप्पाच्या जयजयकारात श्रीमूर्तीची कार गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या विसर्जन मिरवणुकीत सध्या अमेरिकेत असलेले अनंत जांगळे, त्यांची पत्नी अश्विनी, मुलगा अभिजीत, सुशांत, सुना अमृता, मेघना, नातवंडे अहाना, अर्जुन, रिदान व शेषा तसेच डलासमधील हिंदू बंधू-भगिनींनी सहकुटुंब उत्स्फूर्त सहभाग दर्शवला होता.

 belgaum

1 COMMENT

  1. Very exciting. I am proud of my daughter Gayatri who is doing her Masters degree in Architecture at Daekin University,Geelong-Australia along with Ggururaj, Shlok, Sahil, Ayush, Akash, Aditya, Janhvi, Bhakti & Kaustubh. They all are so enthusiastic that they make very good arrangements for the Indian devotees who visit their place for Ganesh darshan. I pray Ganesha to bless all of them for their further studies & career.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.