belgaum

बेळगाव लाईव्ह :बाप्पा म्हणजे सर्वांचीच लाडकी देवता. बाप्पा येणार याची चाहूल लागली की आम्ही सारे बेळगावकर तयारीला लागतो. बाप्पाला कसे आणायचे, कसे विराजित करायचे, त्याला रोजचा नैवैद्य कसला आणि सजावटीची यंदाची थीम काय….एक ना अनेक…. गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. आम्हा बेळगावकरांना दसरा, दिवाळी पेक्षा जास्त गणेश उत्सव प्रिय वाटतो. यावर्षीही हेच वातावरण आहे. बाप्पा आलाय आणि त्याचा उत्सव जोरदार होतोय.

bg

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची विधायकता जपणारा आमचा गणेशोत्सव आहे. पूर्वी फटाक्यांची जोरदार आतशबाजी व्हायची. रोज लाखो करोडो रुपयांचे फटाके वाजायचे. एकाधी सार्वजनिक मंडळाची आरती झाली की फटाक्यांच्या होणाऱ्या धुरातून वाट काढणे मुश्किल व्हायचे. पण आजकाल चित्र बदलले आहे. फटाके वाजतात पण त्याला मर्यादा आली आहे. बाप्पाच्या जल्लोषाला आता पारंपारिक वाद्ये वाजतात. ही खरी विधायकता बेळगावच्या उत्सवाने जपली आहे.

घरगुती आणि सार्वजनिक उत्सव या बाबतीत विचार केला तरी चित्र बदलताना दिसते. पूर्वी गणेश चतुर्थीला पहिल्यांदा घरा घरातील मूर्ती आणून पुजायाच्या आणि नंतर उशीरपर्यंत मंडळांच्या मूर्तींचे आगमन चालायचे. पण आज मंडळांनी ही धावपळ टाळली आहे. यामुळेच आठवडाभर आधी पासूनच आगमन सोहळे रंगताहेत. सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे आधीच आगमन झाले आहे. पुढील वर्षी ही पद्धत अधिक जोमाने चालणार असे दिसते.

बाप्पाला वाजतगाजत आणायचे आणि त्याचे प्रेमाने आदरातिथ्य करायचे यात प्रत्येक बेळगावकर रमतो, रंगतो आणि श्रद्धा जपत राहतो.
मंडळे फक्त उत्सवापूर्ती मर्यादित न राहता, वर्ष भर कार्यरत राहतात. पूर्वीसारखा वर्गणीचा चुराडा होत नाही. त्यातून महाप्रसाद होतात. गोरगरीबांना मदत होते. गरजू विद्यार्थ्यांना शुल्क मिळते. आणि अनेकांना जगण्याची नवी उमेद मिळते. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सव सुरू करताना हीच उद्दिष्ट्ये समोर ठेवली होती. आम्ही बेळगावचे रहिवासी ती आता खऱ्या अर्थाने जपत आहोत. असे म्हणता येईल.तुम्हाला याबद्दल काय वाटते आणि तुम्ही हा उत्सव साजरा करताना नेमकी काय वैशिष्ठे जपता, हे खाली कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.

असा आहे बेळगावातील पहिल्या गणेश मंडळाचा इतिहास

पुण्यानंतर शहरातील मार्केट झेंडा चौक येथे लोकमान्य टिळकांच्या हस्ते श्री गणेशाची प्रतिष्ठा करून देशात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव बेळगाव गावात सुरू झाला. आपली ही परंपरा 119 वर्षे अखंडित सुरू ठेवणाऱ्या आणि अलीकडच्या काळात अनेक उपक्रम राबविणाऱ्या झेंडा चौक मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे आपले एक आगळे वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढाकाराने सार्वजनिक गणेशोत्सवाला 1894 मध्ये पुण्यात सुरुवात झाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता आणि संघटन करण्यासाठी या उत्सवाच्या व्यासपीठाचा वापर करण्यात आला. बेळगावातील गोविंदराव याळगी आणि लोकमान्य टिळक यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. टिळक बेळगावात आले की याळगी यांच्याकडे वास्तव्य करत. बेळगावातील स्वातंत्र्य लढ्यात उतरलेल्या नागरिकांना पुण्यात सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना आवडली.

त्यांनी तशा पद्धतीचा गणेशोत्सव बेळगावातही सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानंतर बेळगावातील मार्केट कांदा मार्केट येथील विष्णू पाटणेकर यांच्या धान्य दुकानात शनिवार दि. 2 सप्टेंबर 1905 रोजी लोकमान्य टिळकांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्याद्वारे सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करण्यात आली.

झेंडा चौक मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळांनी यंदा 119 वर्ष पूर्ण केली आहेत. या प्रवासात गणेशोत्सवाची परंपरा कधीच खंडित झाली नाही. सदर मंडळाने 100 वर्षे पूर्ण होताच वर्गणी जमा करणे बंद केले आहे. श्री गणेशाच्या आगमनावेळी पदाधिकाऱ्यांची पारंपरिक वेशभूषा आणि कांही प्रथा यामध्ये आजतागायत बदल झालेला नाही.

डोकीवर पगडी, उपरणे, श्री मूर्तीची पालखी मिरवणूक आणि पारंपरिक वाद्य अशी परंपरा आजही तशीच आहे. गेल्या तीन वर्षातील कोरोनाच्या निर्बंधानंतर यंदा मुक्त वातावरण असल्यामुळे या मंडळांनी बाप्पाचे जल्लोषी स्वागत केले.

बेळगावातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या झेंडा चौक मध्यवर्तीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाबद्दल माहिती देताना श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी म्हणाले, दरवर्षी युवा पिढीला शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व कळावे. त्यांच्या व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी करेला स्पर्धा आणि शरीरसौष्ठव स्पर्धा घेतली जाते. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपताना दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. मागील कोरोना संकटकाळात या मंडळातर्फे विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात मद्यपान करून येण्यास बंदी आहे.

गणेशोत्सव काळात मांसाहार निषिद्ध असतो. पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व ध्यानात घेऊन सदर मंडळातर्फे इतरांप्रमाणे डॉल्बीचा अवलंब केला जात नाही. फटाक्यांच्या आतषबाजीवर तर पूर्णपणे बंदी असते असे सांगून भाविकांना गणेशोत्सवाचा निखळ आनंद लुटता यावा हा या मागचा आमचा उद्देश आहे, असे कलघटगी यांनी स्पष्ट केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.