बेळगाव लाईव्ह:परदेशात आपली मराठमोळी संस्कृती आणि परंपरा जपण्याच्या कार्यात हातभार लावणाऱ्यांपैकी मूळचे बेळगावचे सागर पाटील हे एक आहेत. ‘त्रिविक्रम ढोल -ताशा पथक दुबई’ या संपूर्ण आखाती देशातील पहिल्या व एकमेव पारंपारिक ढोल -ताशा संस्थापक असलेल्या सागर यांनी या वाद्य संस्कृतीचा वारसा नव्या पिढीकडे सोपविण्यासाठी आता ‘त्रिविक्रम बालमित्र ढोल ताशा पथक दुबई’ हे भारताबाहेरील जगातील पहिले लहान मुलांचे ढोल -ताशा पथक स्थापन केले आहे.
त्रिविक्रम ढोल -ताशा पथक दुबई हे संपूर्ण आखाती देशात स्थापन झालेले पहिले व एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक आहे. दुबईमध्ये या पथकाची स्थापना सागर पाटील यांनी सन 2017 मध्ये केली. महाराष्ट्राचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढोल -ताशा संस्कृतीचा प्रचार या पथकाने आजवर केला आहे.
या पथकाला महाराष्ट्र शासनाने खास मराठी भाषा सन्मान देऊन गौरविले आहे हे विशेष होय. त्रिविक्रम ढोल -ताशा पथक दुबईचे नुकतेच 150 प्रयोग पूर्ण झाले असून, ढोल ताशा संस्कृतीचा वारसा नवीन पिढीला सोपवण्यासाठी या पथकाने खास लहान मुलां करिता नविन पथक सुरू केले आहे.
‘त्रिविक्रम बालमित्र ढोल -ताशा पथक दुबई’ असे या पथकाचे नांव असून यामध्ये 6 ते 14 वर्षाच्या मुला- मुलींचा सहभाग आहे. यामध्ये बेळगावच्या विनंती व साक्षी हसबे या दोघींचा समावेश आहे.
परदेशात वाढणाऱ्या मराठी मुलांना आपल्या महाराष्ट्राच्या कला व संस्कृतीची जाणीव असावी व त्यांना त्याची ओढ लागावी या हेतूने सदर पथकाची स्थापना मी केली, असे पथकाचे संस्थापक सागर पाटील सांगतात. आमच्या पथकातील लहान मुलांना ढोल -ताशा, लेझीम, ध्वज, झांज यांची ओळख करून देण्याद्वारे योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. गेल्या 19 सप्टेंबर रोजी अबुधाबी मध्ये झालेल्या श्री गणेश उत्सवात या बालमित्र पथकाने सुमारे 6000 गणेश भक्तांच्या समोर सादरीकरण करून त्यांचे मन जिंकले.
त्रिविक्रम बालमित्र ढोल -ताशा पथक दुबई या पथकात सध्या 13 कलाकार आहेत व नवीन सभासद नोंदणीला भरभरून प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती देऊन येणाऱ्या काळात बालमित्रांचेे हे पथक दुबईतील अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये ढोल -ताशाचे वादन करून मराठमोळी संस्कृती परदेशात जपण्याच्या कार्यात हातभार लावताना दिसेल, असा विश्वासही मूळचे बेळगावचे असलेल्या संस्थापक सागर पाटील यांनी व्यक्त केला आहे.