बेळगाव लाईव्ह : अलीकडच्या काळात हिंदू धर्मीय आणि इतर धर्मियांचे सण एकाच वेळी येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवर ताण वाढत आहे. त्याच बरोबर हे सण साजरे करताना उत्साहाच्या भरात एकमेकांच्या सण साजरा करण्याच्या पद्धतीत बाधा येऊ शकते, याचा सारासार विचार करून बेळगावच्या मुस्लिम समाजाने एक सामंजस्यपूर्ण निर्णय घेतला आहे.
ईद इ मिलाद सणाची मिरवणूक गणेश विसर्जन दिवशीच येत असल्याने सदर मिरवणूक गुरुवार 28 सप्टेंबर रोजी ऐवजी म्हणजेच दोन दिवस नंतर दिनांक रविवार 1 ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बेळगाव उत्तरचे आमदार आणि अंजुमन संस्थचे अध्यक्ष असिफ सेठ यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ला दिलेल्या एक्सक्लूसिव्ह मुलाखतीत दिली आहे. ईद इ मिलाद रोजी म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधव ईद ए मिलाद ची नमाज मात्र घरातून आणि मशिदितून अदा करणार आहेत असेही त्यांनी सांगितले.
सर्व मुस्लिम जमातीने, सिरत कमिटी आणि अंजुमनच्या माध्यमातून एकमुखाने हा निर्णय घेऊन सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले आहे. एकमेकांच्या सणांचा आदर करणे,धार्मिक रूढी परंपरांना सन्मान देणे, सामाजिक बांधव्य राखणे अश्या पद्धतीचा अनोखा आदर्श निर्माण करून बेळगावच्या मुस्लिम समाजाने एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
आगामी 28 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे बेळगावात गणेश विसर्जन मिरवणूक ऐतिहासिक असते नेमकं त्याचं दिवशी ईद ए मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण आहे.
बेळगावात ईद ए मिलाद निमित्त दरवर्षी मोठी शोभायात्रा काढली जाते. फोर्ट रोड,ओल्ड पी बी रोड,आर टी ओ,चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड ते ग्लोब सिनेमा मैदान पर्यंत असा या शोभा यात्रेचा मार्ग असतो. गणेश विसर्जन व ईद ए मिलाद मिरवणूक एकदाच आल्याने पोलिसांना देखील बंदोबस्ताला मोठा त्रास सहन करावा लागणार होता मात्र आता सदर शोभा यात्रा दोन दिवस उशिरा होणार असल्याने पोलिसांचाही ताण कमी होणार आहे. त्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.