प्रदूषण, जंगलतोड आदींमुळे ढासळत चाललेला पर्यावरणाचा तोल सावरण्यासाठी जगभरात निरनिराळे प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने अलीकडे कांही वर्षांपासून श्री गणेशोत्सवासाठी पर्यावरण पूरक श्रीमूर्तींचे महत्त्व पटवून दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणजे शहरातील मूर्तिकार सुनील आनंदाची यांनी यंदा रुद्राक्षांपासून बनवलेली श्री गणरायाची 12 फुट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती होय.
मारुती रोड, गांधीनगर येथील मूर्तिकार सुनील सिद्धाप्पा आनंदाचे यांचा प्राधान्याने देव देवतांच्या पर्यावरण पूरक मूर्ती बनवण्यात हातखंडा आहे. मूर्ती कलेची आवड असल्यामुळे आपली ही कला ते आपला प्लंबिंगचा व्यवसाय सांभाळून फावल्या वेळात जोपासत असतात. गणेशोत्सवासाठी मागणीनुसार पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्ती तयार करणाऱ्या सुनील यांनी यंदा नानावाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी तीन मुखी रुद्राक्षांची श्रीमूर्ती साकारली आहे. अद्याप सदर मूर्ती पूर्णपणे तयार झाली नसली तरी 12 फूट उंचीच्या या मूर्तीसाठी आतापर्यंत 34,295 तीन मुखी रुद्राक्षांचा वापर करण्यात आला आहे. ही मूर्ती यासाठी पर्यावरण पूरक आहे की ती बनवताना प्लास्टर ऑफ पॅरिस, प्लास्टिक वगैरे कशाचाही वापर न करता फक्त कागद, रट्ट आणि रुद्राक्ष यांचा वापर करण्यात आला आहे. सुनील हे आपला व्यवसाय सांभाळून मूर्ती कला जोपासत असल्यामुळे सदर रुद्राक्षाची श्री गणेश मूर्ती बनविण्यासाठी त्यांना दोन महिन्याचा कालावधी लागला आहे.
बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने मूर्तिकार सुनील आनंदाचे यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मी यंदा श्री गणपतीची 12 फुटी पर्यावरण पूरक मूर्ती बनविली आहे. या बैठ्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती रुद्राक्षांचा वापर करून बनविली आहे.
रट्ट, कागद, कागदाचा लगदा आणि त्यावर रुद्राक्ष या पद्धतीने सदर मूर्ती बनविण्यासाठी जवळपास दोन महिने लागले आहेत. ही मूर्ती घडविण्यासाठी मला माझ्या कुटुंबीयांसह स्थानिक युवक -युवती, महिला अशा सर्वांचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे ही मूर्ती फक्त मी एकट्याने तयार केली नसून आम्ही सर्वांनी मिळून तयार केलेली श्री गणेश मूर्ती आहे असे म्हणायला हरकत नाही. मूर्ती साकारण्यासाठी आवश्यक असलेले तीन मुखी रुद्राक्ष आम्ही नाशिक येथून मागविले आहेत. सध्या या मूर्तीवर 34 हजार 295 रुद्राक्ष चिकटवण्यात आले आहेत. मूर्तीचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. कांही किरकोळ कामानंतर या मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जाईल असे सांगून यापूर्वी मी युज अँड थ्रो पेपर ग्लास, अक्रोड, विविध प्रकारची धान्यं, रेती (वाळू) यांच्या श्री गणेश मूर्ती बनविल्या आहेत. उपवासाचा जो सुकामेवा त्याची श्रीमूर्ती तसेच कृत्रिम फुलांचा वापर करून मूर्ती बनवली आहे, अशी माहिती आनंदाचे यांनी दिली.
लहानपणापासून मला मूर्ती कलेची आवड आहे. गेल्या 30-35 वर्षापासून मी मूर्ती तयार करत आहे. नानावाडी श्री गणेशोत्सव मंडळाची मूर्ती मी कायम बनवतो. दरवर्षी त्यांची पर्यावरण पूरक मूर्तीची मागणी असते. त्यानुसार यावेळी रुद्राक्षाची मूर्ती साकारली आहे. नवोदित मूर्तिकारांना माझा संदेश आहे की प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरेंऐवजी त्यांनी मूर्ती बनवताना शाडू माती, पेपर वगैरेचा वापर करून पर्यावरण पूरक मूर्ती बनवण्यास प्राधान्य द्यावे, असे सुनील सिद्धाप्पा आनंदाचे यांनी शेवटी सांगितले.
https://x.com/belgaumlive/status/1701571720279363730?s=20
Wonderful, innovative creation. Appreciate the talent.