बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील अशोकनगर येथील व्यापारी संकुलाला टाळे ठोकण्याचा आदेश बजावण्यात आला असून टाळे ठोकण्याची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागावर सोपविण्यात आली आहे.
बेळगाव महापालिकेच्या अर्थ स्थायी समितीच्या काल सोमवारी झालेल्या बैठकीत सर्वांगाने चर्चा करून उपरोक्त आदेश जारी करण्यात आला. त्याचप्रमाणे विनापरवाना बांधण्यात आलेल्या या संकुलाला कलम 321 अंतर्गत नोटीस बजावण्याची सूचना नगररचना विभागाला देण्यात आली आहे.
या संकुलाची जागा विद्यार्थी वस्तीगृह बांधण्यासाठी देण्यात आल्याच्या महापालिकेच्या ठरावाची प्रत नगर विकास खात्याला पाठवून त्या जमिनीचा विक्री दस्त रद्द करण्याची विनंती करण्याचा निर्णय देखील कालच्या बैठकीत घेण्यात आला.
अर्थ स्थायी समितीच्या अध्यक्षा विणा विजापूरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अशोकनगर येथील संकुला बाबत तब्बल दीड तास चर्चा झाली.