बेळगाव लाईव्ह :व्हॅक्सिन डेपो, टिळकवाडी येथील पोस्ट कार्यालयासमोरील रस्त्याशेजारील झाडाखालील फुटपाथवरील कचऱ्याची साफसफाई करण्याबरोबरच झाडांच्या बुंध्यांची रंगरंगोटी करण्यात आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
व्हॅक्सिन डेपो येथील टिळकवाडी पोस्ट कार्यालया समोरील रस्त्याशेजारी फूटपाथला लागून खाली मंडोळी रोडपर्यंत रांगेने मोठमोठी झाडे आहेत. ही झाडे 80 ते 100 वर्षे जुनी आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून यापैकी नेहरू रोड आणि महर्षी रोड कॉर्नरच्या ठिकाणी असलेल्या झाडाखाली नागरिकांकडून कचरा टाकला जात होता.
विशेष करून नेहरू रोड कॉर्नरच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण व कचऱ्याचा ढीग साचलेला असायचा. त्यामुळे या परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण पसरलेले असायचे. मात्र आता या फुटपाथच्या ठिकाणी झाडाखालील कचऱ्याची साफसफाई करून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रस्त्याशेजारील जुन्या झाडांच्या बुंध्यांची रंगरंगोटी करण्यात येत आहे.
याशिवाय रस्त्याशेजारी नवी झाडे लावण्याबरोबरच या मार्गावरून ये -जा करणाऱ्या पादचाऱ्यांना निसर्गाचा जुना ठेवा असलेल्या झाडांच्या सावलीत विश्रांती घेता यावी म्हणून फूटपाथवर बाकडीही बसविण्यात आली आहेत.
या पद्धतीचे स्तुत्य कार्य करून व्हॅक्सिन डेपो रोडचे वातावरण स्वच्छ व प्रसन्न केल्याबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
यासाठी जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्यासह महर्षी रोड नेहरू रोड वगैरे परिसरातील नागरिक महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, नगरसेवक आनंद चव्हाण, स्वच्छता निरीक्षक कलावती अदमनी, पर्यवेक्षक संजय पाटील आणि संबंधित सर्व महापालिका कर्मचारी आणि सफाई कामगारांना धन्यवाद देत आहेत.