बेळगाव लाईव्ह :राज्यातील ग्रामपंचायतींकडून ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या व्यक्तीचा वैद्यकीय खर्च, त्याचप्रमाणे कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आदेश ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याने बजावला आहे.
भटक्या कुत्र्यांचे संरक्षण, संतती नियंत्रण, भटक्या कुत्र्यांवर उपचार आणि निगा याबाबत विविध मार्गदर्शक तत्वे ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याने जाहीर केले असून त्यात संबंधित ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांनी चावलेल्या व्यक्तींना वैद्यकीय खर्चाची भरपाई द्यावी.
तसेच मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई दिली जावी, असे स्पष्ट केले आहे. ग्रामविकास व पंचायत राज खात्याने जारी केलेल्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्या संदर्भातील भरपाई पुढील प्रमाणे असणार आहे.
भटक्या कुत्र्याने चावल्यानंतर मोफत उपचार सुविधा उपलब्ध नसल्यास चाव्याच्या तीव्रतेनुसार 2 ते 3 हजार रुपये नुकसान भरपाई आणि 1 ते 2 हजार रुपये वैद्यकीय उपचार खर्च दिला जावा. कुत्र्याचा मोठा हल्ला असल्यास 10 हजार नुकसान भरपाई आणि 5 हजार वैद्यकीय खर्च दिला जावा.
कुत्र्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला 50 हजार रुपये नुकसान भरपाई, तर प्रौढांसाठी 1 लाख नुकसान भरपाई म्हणून दिली जावी. त्याचप्रमाणे अंत्यसंस्कारासाठी 5 हजार रुपये आणि मृत्यूपूर्वी झालेला वैद्यकीय खर्च ग्रामपंचायतीने भरावा.