लक्ष्मी टेकडी नजीकच्या मुख्य जलवाहिनीला कॅम्प जवळ लागलेल्या गळतीची दुरुस्ती केली जाणार असून त्यासाठी बेळगाव शहराच्या कांही भागांना उद्या शनिवार दि. 19 व रविवार दि. 20 ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा होणार नसल्याचे केयुआयडीएफसीने कळविले आहे.
जलवाहिनी दुरुस्तीच्या कारणास्तव उद्यापासून दोन दिवस मजगांव, नानावाडी, चिदंबरनगर, शहापूर, वडगाव, हिंदवाडी, चन्नम्मानगर पहिले व दुसरे स्टेज, राजारामनगर, बी मंग्रीसी कॉलनी, महावीरनगर, मँगो मेडोस, कलमेश्वर सोसायटी, अनगोळ आदी भागातील 24 तास योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन कर्नाटक शहर पायाभूत सुविधा विकास व वित्त महामंडळाच्या (केयुआयडीएफसी) बेळगाव विभाग व्यवस्थापकांनी केले आहे. राकसकोप जलाशय गेल्या 15 दिवसांपूर्वी तुडुंब भरल्यापासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता. पाणीही मुबलक मिळत होते. मात्र आता जलवाहिनीला गळती लागल्याने शहराच्या कांही भागाला पावसाळ्यातही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
सणासुदीचे दिवस सुरू होत असताना या पद्धतीने पाण्याची समस्या निर्माण होणार असल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.