बेळगाव लाईव्ह :मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी बचाव या नव्या पॅनलची सत्ता आली असली तरी आव्हान मात्र कायम आहेत. पराभूत पोतदार पॅनलचे प्रमुख अविनाश पोतदार यांनी हा कारखाना उभा करून गाळप हंगाम सुरू करण्याबरोबरच कारखान्याची वृद्धी केली. तथापि आता सत्तेवर आलेल्या आर. आय. पाटील, तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बचाव पॅनलला कारखाना चालविणे, याचे आव्हान असून तो आणखी विकसित करणे हे आव्हान पेलवेल का? याबाबत सध्या जोरदार चर्चा होत आहे.
साखर कारखाना चालविणे सोपे नाही. त्यामुळे सत्ताधारी पॅनलला विरोधी गटात असले तरी अविनाश पोतदार यांचे सहकार्य घ्यावेच लागणार आहे आणि मुळात हा सहकारी तत्त्वावरील कारखाना असल्यामुळे तो चालविण्यासाठी सत्ताधारी -विरोधी अशा सर्वांमध्ये समन्वय असणे आवश्यकच आहे. आता सत्ताधारी शेतकरी बचाव पॅनलवर सहकार तत्व पुढे नेण्याची जबाबदारी आहे. थोडक्यात निवडणुकीचे राजकारण विसरून कारखान्याच्या विकासासाठी सर्वांनी संघटित कार्य करणे गरजेचे आहे.
काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जोरदार चूरस दिसून आली. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच पोतदार पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले. आता निवडणूक संपल्यामुळे कारखाना चांगल्या पद्धतीने चालावा, कारखान्याच्या विकास करून शेतकऱ्यांचे हित साधले जावे यासाठी निवडणुकीचे राजकारण बाजुला सारून सर्व संचालकांनी एकत्रितपणे कारखान्याला वैभव प्राप्त करून द्यावे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
तालुक्यातील सहकारी तत्वावरील एकमेव साखर कारखाना म्हणून ‘मार्कंडेय’ची ओळख आहे. अनेक संकटांचा सामना केल्यानंतर गेल्या 3 वर्षांपासून कारखाना सुरू झाला आहे. त्यामुळे तो असाच अखंडित सुरू ठेवणे आणि परिसरातील शेतकर्यांना आपल्याकडे वळवणे, कारखान्यासमोरील अडचणी सोडविणे या गोष्टींना नव्या संचालक मंडळाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. कारखाना शेतकऱ्यांच्या हातात राहावा आणि शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी संचालकांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्या दृष्टीने वेगवेगळ्या योजना हाती घ्याव्या लागणार आहेत.
मार्कंडेय कारखान्यावर निवडणूक आलेल्या 15 संचालकांपैकी दोघे, तिघे वगळता सर्वांना मार्कंडेय कारखान्याच्या कामकाजाची चांगली जाण आहे. त्यांनी याआधीही मार्कंडेय कारखान्यावर संचालक म्हणून काम केले आहे. त्यामध्ये सर्वाधिक अनुभव मावळते अध्यक्ष अविनाश पोतदार यांना आहे. त्यामुळे यापुढे त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे. तानाजी पाटील आणि आर. आय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बचाव पॅनेलने बहुमत मिळवून सत्ता मिळवली आहे. या पॅनेलमध्ये लक्ष्मण नाईक आणि बसवराज गाणिगेर यांनी मार्कंडेयचे याआधीही संचालक पद भूषवले आहे. तर पोतदार पॅनेलमधून निवडणूक आलेल्या काहींनी याआधी संचालक म्हणून काम केले आहे. संस्था गटातून कारखान्यावर निवडून गेलेले सुनील अष्टेकर यांना सहकार क्षेत्रातील बराच अनुभव आहे मुतगा कृषी पत्तींन पासून मराठा बँक संचालक म्हणून त्यांनी काम करताना आता मार्कंडेय वर संचालक म्हणून धडक मारली आहे.त्यामुळे या सर्वांची मोट बांधून कारखान्याचे काम सुरळीत करण्याची जबाबदारीही सत्ताधारी पॅनलच्या दोन्ही पाटलांवर असणार आहे.
अविनाश पोतदार यांना मार्कंडेय कारखान्याच्या प्रदीर्घ अनुभव आहे. कारखाना चांगल्या स्थितीत आणण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे नव्या संचालक मंडळाने त्यांच्या सोबतीने एकत्रित काम करण्याची गरज आहे. कारण या कारखान्याशी शेतकर्यांचा भावना जोडलेल्या आहेत. बेळगाव तालुक्यातून म्हणावा तसा उसाचा पुरवठा होत नसल्यामुळे नव्या संचालक मंडळाला सर्वप्रथम शेतकर्यांच्या घरापर्यंत जावे लागणार आहे. सध्या कारखान्यावर नवा गडी, नवे राज्य आले असले तरी कारभार चालवण्यासाठी सर्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागणार आहेत.
मार्कंडेय सहकारी कारखान्यावरील सत्ताधारी तानाजी पाटील आणि आर. आय. पाटील यांनी या कारखान्यासाठी मोठा आर्थिक हातभार लावला आहे. त्यामुळे आगामी काळातही कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी राजकारणविरहित योग्य पद्धतीने कारभार चालेल अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आशा आहे. तसेच गळीत हंगामाला लवकर सुरुवात केल्यास तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होईल, असे मतही त्यांच्यामध्ये व्यक्त होत आहे.