बेळगाव लाईव्ह:निपाणी नगरपालिकेला नव्याने 14 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास अनुमती दिली जाऊ नये. तसेच आम्हाला न्यायालयाच्या आदेशानुसार प्रलंबित पगार देऊन कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतले जावे, अशी मागणी निपाणी नगरपालिकेच्या कामावरून कमी केलेल्या 10 सफाई कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
निपाणी नगरपालिकेच्या संबंधित सफाई कर्मचाऱ्यांनी कामगार नेत्यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सफाई कामगारांचे नेते म्हणाले की, हमजू अशोक वळूंद्रे, संजय विठ्ठल घाटगे, अशोक सत्याप्पा बनसोडे, सुदाम बाळू कांबळे, विनोद सुदाम कांबळे, जनार्धन सुदाम कांबळे, सुमन वसंत कांबळे (काळे), सुजाता रामचंद्र कांबळे, बाळू मारुती गस्ती, लता दुर्गादास वाघेला, यशोदा उमेश साळुंखे, सुजाता मल्लाप्पा मड्डी व नामदेव हरिबा कांबळे (सर्व रा. निपाणी ता. निपाणी जि. बेळगाव) या 10 सफाई कामगारांना निपाणी नगरपालिकेने 1993 ते 97 पर्यंत कामावर घेतले होते. त्यानंतर कोणतीही पूर्व सूचना न देता 2004 मध्ये या सर्वांना कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे या कामगारांनी 2006 मध्ये न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर बेळगाव कामगार न्यायालय व हुबळी कामगार न्यायालयाने 2010 मध्ये कामगारांच्या बाजूने निकाल दिला.
सदर कामगारांना कायमस्वरूपी नोकरी सामावून घेतले जाऊ शकते असे नमूद करताना त्यांना 25 टक्के प्रलंबित पगार देऊन पुन्हा कामावर घ्यावे असा आदेश न्यायालयाने दिला. त्यावेळी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच निपाणी नगरपालिका आयुक्तांनी कामगार न्यायालयाने दिलेल्या निकालावर उच्च न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळविला.
आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे, वकिलांची फी देता येत नसल्यामुळे त्यावेळी सफाई कामगारांनी 2018 पर्यंत स्थगिती आदेश उठवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र 2018 पासून दोन वकील नेमून 2022 मध्ये आम्ही तो स्थगिती आदेश उठवला. त्यावेळी म्हणजे गेल्या नोव्हेंबर 2022 मध्ये उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश उठवण्याबरोबरच संबंधित सफाई कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे आणि मागील प्रलंबित पगार 25 टक्के इतक्या प्रमाणात द्यावा असा आदेश दिला आहे. यासंदर्भात आम्ही यापूर्वीच जिल्हाधिकारी, नगरपालिका आयुक्त वगैरे संबंधित सर्वांशी पत्रव्यवहार केला आहे.
मात्र डिसेंबरपासून आतापर्यंत त्याला प्रत्युत्तर आलेले नाही अशी माहिती देऊन दरम्यान निपाणी नगरपालिकेकडून नव्या 14 सफाई कामगारांची नियुक्ती करून घेतली जाणार आहे. यासाठी सदर नियुक्ती रोखावी आणि कामावरून कमी केलेल्या संबंधित दहा कामगारांना न्यायालयाच्या आदेशानुसार न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या निवेदनाद्वारे केली आहे, असे कामगार नेत्याने स्पष्ट केले. यावेळी निपाणी नगरपालिकेचे संबंधित सफाई कामगार उपस्थित होते.