बेळगाव लाईव्ह :बळ्ळारी नाल्यात गाळ आणि कचरा भरल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे परिसरातील हजारो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान होत आहे.
त्यामुळे बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्याची स्वच्छता करण्यात यावी, या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांच्या मागणीची दखल घेत राज्याचे कृषी मंत्री एच. जी. प्रभाकर यांनी महापालिकेला आदेश दिले आहेत.
नारायण सावंत यांनी बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्याबाबत कृषी मंत्री प्रभाकर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. बेळगाव परिसरातून मुचंडीपर्यंत गेलेल्या बळ्ळारी नाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाल्यात गाळ आणि कचरा साचून आहे. तो दूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात परिसरातील हजारो एकर जमिन पाण्याखाली जाऊन शेतकर्यांना दरवर्षी आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे या नाल्यांतील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाव्दारे केली होती.
बेळगाव लाईव्हने देखील अनेकदा बेळळारी नाल्याच्या विषयावर अनेकदा लिखाण करत बेळळारी नाला नसून बेळळारी तो ओढा आहे त्याला जतन करण्याची गरज व्यक्त केली होती नाल्याची खुदाई करून पाण्याचा निचरा व्हावा अशी देखील सदरातून मागणी करण्यात आली होती.जून महिन्यात पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी देखील नाल्याची पाहणी केली होती मात्र खुदाई किंवा स्वच्छतेचे आदेश देण्यात आले नव्हते मात्र आता सावंत यांच्या मागणीला यश आले असून थेट कृषी मंत्र्यांनी नाला स्वच्छतेचे आदेश दिले आहेत.
सावंत यांच्या निवेदनाच्या दखल घेत मंत्री प्रभाकर यांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे बळ्ळारी आणि लेंडी नाल्यातील गाळ दूर करण्यात यावा. पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होईल, याची खबरदारी घेण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे आता या पत्रावर महापालिका कोणती अंमलबजावणी करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.