बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानित शाळांमध्ये आर्थिक गैरव्यवहार अंतर्गत शिक्षकांची भरती करण्यात येत असून त्या अनुषंगाने आपल्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप सदर संस्थेच्या एम्.ए.बी.एड्. विशेष गुणवत्ताप्राप्त इंग्रजी विषयाच्या शिक्षिका अक्षता नायक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांनी या प्रकरणी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे, असा दावा केला आहे.
गैरव्यवहारासंदर्भात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना याविषयी तक्रार देण्यात आली असून जिल्हाधिकार्यांनी डीडीपीआय व बीईओंना या प्रकरणाची खोलवर चौकशी करून सदर संस्थेवर कडक कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. संस्थेच्या अध्यक्षांनी आपणास वारंवार सरकारी नोकरीचे स्पष्ट आश्वासन देऊन आता शिक्षक भरतीची रितसर परवानगी मिळताच अन्य उमेदवाराकडून लाखो रूपये घेऊन आपली घोर फसवणूक केली आहे असाही आरोप त्यांनी केलाय.
गेल्या 9 वर्षांपूर्वी 12 लाखाची सरकारी नोकरी देतो म्हणून खोटे आश्वासन देऊन संस्थेत 3 हजारच्या तुटपुंज्या पगारात काम करवून घेतले. संबंधित संस्थेच्या शाळांमध्ये 20 उमेदवारांना लाखो रूपयांच्या बदल्यात सरकारी नोकरी देत असल्याचा आरोप अन्यायग्रस्त शिक्षिकेने केला आहे. केवळ आपण विशिष्ठ जातीचे असल्यानेच माझ्यावर हा अन्याय केल्याचेही तिने नमूद केले आहे.
राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिध्दरामय्या, शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांच्यासह संबंधित सर्वांकडे तक्रार देण्यात आली आहे. सर्व प्रकाराने व्यथित झाल्याने मला प्रचंड मानसिक धक्का बसला आणि त्यामुळे इस्पितळातही दाखल व्हावे लागले होते. माझ्या तसेच कुटुंबाच्या जिवितास कोणताही धोका झाल्यास त्याला संबंधित संस्थेचे अध्यक्ष संपूर्ण जबाबदार राहतील, असे अन्यायग्रस्त शिक्षिकेने स्पष्ट केले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात संस्थेविरूध्द याचिका दाखल करून न्याय मागणार असल्याचेही तिने सांगितले.
त्या संस्थेकडून खुलासा
श्रीमती अक्षता नायक यांनी शिक्षक नेमणुकी संदर्भात केलेले आरोप हे धक्कादायक, सत्यापासून दूर, खोटे, बिनबुडाचे व वाईट हेतूने केलेले आहेत. शिक्षक नेमणुका ह्या शिक्षण खात्याच्या नियमानुसार उमेदवाराच्या शैक्षणिक व मुलाखतीतील कामगिरी नुसार केल्या आहेत. या नेमणुकीमध्ये शिक्षण खात्याच्या नियमांचे उल्लंघन किंवा कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही.
सदर संस्था एक नामांकित संस्था असून गेली ९२ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्य करीत आहे. मुलाखतीचा गुणतक्ता माहितीसाठी जोडला आहे. बेळगाव शहर शिक्षणाधिकारी यांनी या संदर्भात केलेली विचारणा व त्यांना दिलेला खुलासा आपल्या माहितीसाठी जोडला आहे असे खुलासा पत्रक देण्यात आले आहे.
[