राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांद्वारे जनतेचे भले होण्याऐवजी फक्त विणकरच नाही तर सर्वसामान्यांचीही गॅरंटी संपणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असा आरोप करत सरकारने विणकारांसाठी सध्याच्या सवलतीचा वीज बिलाच्या योजने ऐवजी पूर्वीप्रमाणे प्रति युनिट 1.25 रुपये दराने वीज पुरवण्याची योजना अंमलात आणावी, अशी मागणी उत्तर कर्नाटक व्यक्तीपर नेकार होराट समिती संचालक गजानन गुंजेरी यांनी केली आहे.
उत्तर कर्नाटक व्यक्तीपर नेकार होराट समिती बेळगाव जिल्हा शाखेतर्फे शहरातील हॉटेल मिलन येथे आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. गजानन गुंजेरी म्हणाले की, राज्य सरकारची विज बिल सवलतीची योजना विणकारांसाठी त्रासदायक ठरत आहे. पूर्वी विणकारांना 1 रुपये 25 पैसे दराने वीज पुरवण्याची योजना होती.
विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या 2004 मध्ये जेंव्हा उपमुख्यमंत्री होते त्यावेळी ही योजना अंमलात आणण्यात आली होती. गेल्या 17 -18 वर्षापासून आम्हाला या योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र आता विणकारांकडून 7.45 रुपये प्रति युनिट दराने विज बिल आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी झाली तर विणकर बांधवांवर आर्थिक संकट कोसळून ते रस्त्यावर येणार आहेत.
सध्याच्या वीज दरवाढीच्या धोरणानुसार विणकारांना त्यांचे माग बंद असो अथवा चालू दरमहा 10 अश्वशक्तिमागे किमान 1500 रुपये भरावे लागणार आहेत. जे परवडणारे नाही. त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी पूर्वीप्रमाणे प्रति युनिट 1.25 रुपये याप्रमाणे विणकारांना वीज पुरवठा करावा. कोरोनाचे संकट कोसळल्यापासून विणकरांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. सरकारकडून त्यांना कोणतेच अनुदान मिळत नाही. विणकारांना पूर्वी घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळत होते ते बंद झाले आहे. विणकारांसाठीची आरोग्य विमा योजना बंद झाली आहे. विणकारांना कर्जामध्ये मिळणारी सवलतही बंद करण्यात आली आहे. या पद्धतीने विणकर बांधवांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. विद्यमान राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजनांमुळे फक्त विणकरच नाही तर सर्वसामान्यांची ही गॅरंटी संपणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना काळापासून विणकारांवर सातत्याने संकटं कोसळत आहेत. आम्हा विणकारांवरील अन्याय असाच सुरू राहिल्यास व्यवसायासाठी आम्हाला परराज्यात आश्रय शोधण्याची वेळ येणार आहे असेही गुंजेरी यांनी पुढे स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस उत्तर कर्नाटक व्यक्तीपर नेकार होराट समितीचे रोहित मोरकर, विनोद बंगोडी, आनंद उपरी, बसवराज ढवळी, नागराज हुगार, विनायक कामकर, संतोष टोपगी, बसवराज कामकर, अंजनेय दुधानी, मंजुनाथ भंडारी आदी उपस्थित होते.