गेल्या बुधवारी अंगडी कॉलेज समोर नव्याने घातलेल्या गतिरोधकावर अपघात होऊन अपघातात जखमी झालेल्या त्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याचा उपचार सुरू असताना इस्पितळात मृत्यू झाला आहे.
सदर अपघात झाल्यावर बेळगाव live ने त्या स्पीड ब्रेकर कडे घटनास्थळी जाऊन वृत्त दिले होते त्यानंतर जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी बॅरिकेड्स देखील लावले होते.
सावगांव रोडवरील अंगडी कॉलेजनजीक रस्त्यावरील अवैज्ञानिक पद्धतीने घातलेल्या गतिरोधकावरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा दुर्दैवाने काल उपचाराचा फायदा न होता मृत्यू झाला.
मयत दुर्दैवी विद्यार्थ्याचे नांव ऋषिकेश सत्यप्रमोद कुलकर्णी (वय 27, रा. बुधवार पेठ टिळकवाडी) असे आहे. ऋषिकेश हा गेल्या बुधवारी दुचाकीवरून कॉलेजला जात असताना सांवगाव रोडवरील अंगडी कॉलेज जवळ रस्त्यावर घातलेल्या अवैज्ञानिक पद्धतीच्या गतिरोधकावरून पडून गंभीर जखमी झाला होता.
त्यावेळी ऋषिकेशला तातडीने एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की उपचाराचा फायदा न होता काल सोमवारी त्याचा मृत्यू झाला. ऋषिकेश हा सिव्हिल इंजीनियरिंग शाखेत शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याच्या पश्चात आई -वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.
सदर अपघाताची बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलिसांनी युवा विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या त्या अवैज्ञानिक गतिरोधकाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. उपरोक्त दुर्दैवी घटनेमुळे प्रशासनाने जागे होऊन रस्त्यांचा वापर करणाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावरील गतिरोधक आणि प्रवेश बंदी वैज्ञानिक दृष्ट्या योग्य प्रकारे करणे अत्यावश्यक आहे. ज्यामुळे यापुढील आणखी जीवितहानी टाळता येऊ शकेल.
हे देखील वाचा…