Saturday, January 25, 2025

/

खानापूर तालुक्यात काश्मीरची अनुभूती!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा आणि तालुका हा निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो. चोहोबाजूंनी वेढलेल्या निसर्ग आणि वनराईने बेळगावला महत्वपूर्ण वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. सध्या वर्षा पर्यटनाला बहर आला असून बेळगावमधील विविध निसर्गरम्य प्रेक्षणीय ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. बेळगावमधील खानापूर तालुक्याकडे पर्यटकांची पावले वळत असून या तालुक्यात असणाऱ्या विविध पिकनिक स्पॉटवर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

खानापूर तालुक्यातील नागरगळी जंगलातील हंडीभडंगनाथ टेकडी हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे . धारवाड-पणजी महामार्गावरील कुंभारवाडा गावापासून ३ किमी अंतरावर सर्वात उंच टेकडीवर असलेल्या हंडीभडंगनाथ मठाला सुमारे ४०० वर्षांचा इतिहास आहे. घनदाट जंगलाने वेढलेल्या हंडीभडंगनाथ येथे शिवालय आहे. पीरयोगी शेरनाथ, पूर्वी येथे तपश्चर्या करणाऱ्या नऊ स्वामींचे मंदिर, आणि त्यांच्या स्मृतिस्थळांसह नवनाथ गुहादेखील आहे. हंडीभडंगनाथाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील अरुंद गुहा आहेत.

मठाच्या एका बाजूला असलेल्या या गुहा यात्रेकरूंना एक विशेष अनुभव देतात. या गुहेतील पवित्र हंडीतून निघणारे तीर्थ ग्रहण करण्यासाठी प्रत्येक शिवरात्रीला हजारो भाविक येथे गर्दी करतात. याठिकाणी दर १२ वर्षांनी उत्तर भारतातील नाथपंथीय संत भेट देतात. आणि २१ दिवस विविध पूजाविधी करतात. याठिकाणी कित्तूर राणी चन्नम्मा यांनी महाद्वार बांधले होते असे मानले जाते. तसेच क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांनी देखील या टेकडीवर शत्रूपासून सावध राहण्यासाठी काहीकाळ याठिकाणी वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. या टेकडीच्या चारही दिशांनी २० ते ३० किमी अंतरापर्यंत डोंगरांचे नैसर्गिक सौंदर्य पाहता येते.Khanapur logo

 belgaum

याचप्रमाणे असोगा हेदेखील येथील निसर्गरम्य स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. मलप्रभाच्या पठारावर परशिवाचे मंदिर असलेली ही पवित्र भूमी असून खानापूर शहरापासून ४ किमी अंतरावर मलप्रभा नदीच्या काठावर एक सुंदर पिकनिक स्पॉट आहे. याठिकाणी रामलिंगेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. बांधातून वाहणारे आणि दात धुके असे दृश्य या परिसरात पाहायला मिळते. याठिकाणी शिवरात्रीला मोठी जत्रा भरते. या परिसरात सुंदर बाग असून सामान्य आकाराच्या दगडावरुन वाहणारे मलप्रभा नदीचे पाणी डोळ्यांना सुखावणारे आहे. भाविकांसाठी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी असोगा हे उत्तम ठिकाण आहे. अमिताभ बच्चन – जयबाधुरी अभिनित ‘अभिमान’ या हिट चित्रपटासह अनेक मराठी, कन्नड आणि हिंदी भाषेतील चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे.

खानापूरपासून ३८ किमी आणि बेळगावपासून ४० किमी अंतरावर कणकुंबी हे गाव आहे. कणकुंबी हे उत्तर कर्नाटकातील मलप्रभाचे उगमस्थान आहे. ही नदी एका छोट्या उतारावरून उगम पावते आणि तालुक्यातून वाहत जाऊन मैदानी प्रदेशाला मिळते. कणकुंबी हे घनदाट जंगलांनी वेढलेले आणि राज्यातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेले एक गाव आहे. भौगोलिकदृष्ट्या कणकुंबी हे कर्नाटकात असले तरी तेथील लोकांची भाषा, संस्कृती आणि जीवनशैली गोवा राज्यासारखीच आहे. पावसाळ्यातील कणकुंबीचे
वातावरण, निसर्गसृष्टीचे सौंदर्य, पावसाचा शिडकावा आणि पावसाचा आवाज मनाला भिडतो.

Habbanhatti empty
Habbanhatti  temple file pic

याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील शेवटचे पश्चिमेकडील गाव असणाऱ्या चिगुळे येथील निसर्गही पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. चिगुळे हे गाव कणकुंबीपासून ५ किमी अंतरावर असून पावसाळ्यात येथील हिरवाई पर्यटकांना आकर्षित करणारी ठरते. तालुक्यातील प्रमुख नेसर्गिक सौंदर्य स्थळांपैकी एक असलेले चिगुळे पश्चिम घाटातील सर्वात उंच गाव असून समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर, पश्चिम घाटाच्या टोकावर वसलेले आहे. चिगुळे हे कर्नाटकचे सीमावर्ती गाव आहे. या गावाजवळील उंच ठिकाणावरून उजवीकडे महाराष्ट्र राज्याची सीमा दिसते तर डावीकडे गोवा राज्याची सीमा दिसते. येथे एक धबधबाही असून आकाराने लहान असणारा धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. हे गाव उंचावर असल्याने येथील वारा आल्हाददायक वाटतो.

खानापूर तालुक्यातील चोर्ला गावापासून गोवा राज्याकडे २० किमी अंतरावर चोर्ला घाट आहे. या रस्त्यावरून पश्चिम क्षितिजाकडे गोवा दिसतो. येथील संध्याकाळच्या सूर्यास्ताचे सुंदर दृश्य मंत्रमुग्ध करणारे आहे. या घाटातील हिरवेगार वातावरण, नागमोडी वळणाचा रस्ता, उंचावरून वाहणारी वाऱ्याची झुळूक खास अनुभव देतो.

खानापूर शहरापासून २१ किमी अंतरावर असलेल्या हेमडगा गावात वन विभागाच्या अखत्यारीतील तळेवाडी गावात जाण्यासाठी विभागीय परवानगीने जंगलात ६ किमी प्रवास करत येथील भीमगड अभयारण्य पाहायला मिळते. याठिकाणी शिकारी नियंत्रण केंद्र आहे तसेच तिथून काही किमी अंतरावर एका टेकडीवर मोठी गुहा आहे. हि गुहा इतकी विशाल असून गुहेची विशालता थक्क करणारी आहे. या गुहेत एकावेळी तीनशे ते चारशे लोक बसू शकतील एवढी रुंद आहे. या परिसरात रॉबिन बॅटच्या वटवाघळांचा एक प्रकार आहे जो गुहेत आढळतो. ही वटवाघुळ तळेवाडी खेरीज फक्त कंबोडियातच सापडतात. अशा सामान्य वटवाघळांचा आकार लहान असतो आणि ते शुद्ध शाकाहारी असतात. याशिवाय भीमगडच्या जंगलात पानसुरी खाडी, कळसा आणि भांडुरी खाडी, महादयी मुक्तपणे वाहते. नद्यांचे चमचमणारे पाणी, हिरवेगार वातावरण आणि पक्ष्यांचा किलबिलाट जंगलाची समृद्धी वाढवतोच शिवाय पर्यटकांच्या हृदयालाहि भिडतो.Khanapur news

याच भागात हब्बनहट्टी नावाचे गाव आहे. खानापूरपासून २२ किमी, जांबोटीपासून ५ किमी, बेळगावपासून २८ किमी अंतरावर असलेल्या या गावात मलप्रभा नदीच्या काठी मारुती मंदिर आहे. हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते. कणकुंबी वनपरिक्षेत्रात अतिवृष्टी झाल्यास
हब्बनहट्टी येथील मारुती मंदिर मलप्रभा नदीत बुडते. पावसाळ्यातील तीन महिने मलप्रभात तल्लीन होणाऱ्या मारुतीची पूजा भाविकांकडून नदीकाठीच केली जातेBhimgad

पुढे कर्नाटक- गोवा सीमेवरील दूधसागर धबधबा हे राष्ट्रीय ख्यातीचे पर्यटन स्थळ आहे. हा धबधबा फक्त रेलवे प्रवासातच पाहता येतो हे विशेष. दिवसाच्या प्रकाशात मडगाव- लोंढा मार्गावर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये बसून पर्यटक हा धबधबा पाहू शकतात. अमरावती, गोवा, पूर्णा, चेन्नई, यशवंतपूर एक्स्प्रेस पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा धबधबा ओसंडून वाहतो. टेकडीवरून दुधासारखे फेसाळणारे पाणी याठिकाणी पडते यासाठी या धबधब्याला दूधसागर असे संबोधले जाते. या भागात अलीकडे अनुचित प्रकार घडत असल्याने शिवाय अतिवृष्टीमुळे धबधबा वज्ररूप धारण करत असल्याने वनविभागाने या पर्यटन स्थळावर पर्यटकांना येण्यास मज्जाव घातला आहे.Dudhsagar

जांबोटी जंगलातील चापोलीजवळ वरून कोसळलेल्या महादयी नदीच्या पाण्याने तयार झालेला वज्र धबधबा आणि कणकुंबी जंगलातील परतवाडाजवळ पडणाऱ्या स्थानिक प्रवाहाच्या पाण्याने तयार झालेला वज्रपोहा धबधबा असे दोन्ही धबधबे अद्वितीय आहेत. या धबधब्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी धबधबे वरून वाहतात ती जमीन म्हणजे आपले कर्नाटक, आणि ते ज्या ठिकाणी खाली पडतात त्या प्रदेशाचा भाग गोवा राज्याचा आहे. अशा प्रकारे, या धबधब्यांना दोन राज्यांना जोडणारी संलग्न ठिकाणे देखील म्हटले जाते. जंगल परिसरात हा धबधबा असल्याने या धबधब्याकडे जाणारा रस्ता म्हणावा तितका सोयीस्कर नाही. या धबधब्यांना भेट देण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मुख्यतः धबधबा पाहण्यासाठी स्थानिक व्यक्तीची मदत घ्यावी लागते शिवाय वनविभागाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आणि बंधनकारक आहे.

खानापुरा तालुक्याच्या नागरगळी जंगलात असलेला धबधबा ट्रेकर्ससाठी एक विस्मयकारक ठिकाण म्हणून ओळखला जातो. घनदाट जंगलामधून शांतपणे वाहणारा एक छोटासा धबधबा आणि याचा आवाज यामुळे नागरगळी धबधबा प्रसिद्ध आहे. हा धबधबा सुमारे ४० फूट उंचीवरून खडकावरून खाली कोसळतो. हा धबधबा पाहिल्यास कोणताही थकवा क्षणात नाहीसा होतो अशा पद्धतीने हा धबधबा प्रेक्षकांना आकर्षित करतो. उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली, धारवाड जिल्ह्यातील अळनावर आणि बेळगाव जिल्ह्यातील लोंढा या भागातील जंगलात नागरगळी वनक्षेत्र पसरलेले आहे.या जंगलात उगम पावणारा हा एक छोटा प्रवाह सुमारे १२ किमी अंतर पार करून पुढे जंगलात काळी नदीला मिळतो. या ओढ्याच्या मध्यभागी नागरगळी गावापासून ४ किमी अंतरावर घनदाट जंगलात नागरगळी धबधबा आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालीच या धबधब्याला पायीच भेट देता येते.

जांबोटी जंगलातील भटवडा धबधबा निसर्गप्रेमींसाठी आनंददायी आहे. चापोली- मुडागाई वनक्षेत्रात उगम पावणारा एक छोटा प्रवाह जांबोटीजवळील १५ फूट उंच टेकडीवरून खोल दरीत बुडतो आणि कळमणी गावाजवळ मलप्रभा नदीला जाऊन मिळतो. स्थानिक लोक ज्या भागाला उंचावरून कुशीत पडतात त्या भागाला भटवडा धबधबा म्हणतात . बेळगाव – चोर्ला महामार्गावरील जांबोटी गावापासून कनकुंबीच्या दिशेने महामार्गावर २.५ किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून उजव्या बाजूला असलेल्या छोट्या पदपथावरून अर्धा किमी चालत या ठिकाणी जाता येते.

 belgaum

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.