यंदा मृग आणि आर्द्राने पाठ फिरवली असली तरी शेवटच्या टप्प्यात पुनर्वसूने दमदार साथ दिल्यामुळे सध्या शहर परिसरासह सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. संततधार पावसामुळे गेल्या दोन दिवसापासून शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मान्सूनला गेल्या महिन्याभराच्या विश्रांतीनंतर का होईना आता दिलासादायक प्रारंभ झाला आहे. सध्या पुनर्वसू पावसाच्या धडाक्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच स्मार्ट सिटीच्या ठिकठिकाणीच्या निकृष्ट कामांचे पितळ उघडे पडले आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बहुतांश रस्ते अवैज्ञानिक पद्धतीने बांधण्यात आल्यामुळे या रस्त्यांवर पाण्याची तळी साचली आहेत. त्याचप्रमाणे विकास कामांच्या नावाखाली विविध ठिकाणी केलेल्या खोदकामाचा चिखल दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी मनस्ताप देणारा ठरत आहे.
स्मार्ट सिटीच्या नियोजन शून्य कारभारामुळे येळ्ळूर रोड, वडगाव गणेश मंदिरापासून अन्नपूर्णेश्वरीनगर मंदिराच्या ठिकाणचा रस्त्याच्या एका बाजूला तर मोठमोठे खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी भरले आहे.
वडगावकडून येणारे पावसाचे पाणी बळ्ळारी नाल्याकडे जाण्यासाठी प्रथम गटारी बांधून या रस्त्याचे विकास काम करण्याऐवजी घिसाडघाईने हा रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा न होता ते रस्त्याकडेला तुंबून राहण्याबरोबरच रस्त्यावरून वाहत आहे. या पद्धतीची स्मार्ट सिटीची निकृष्ट नियोजन शून्य विकास कामे सध्याच्या पावसामुळे शहरात ठीक ठिकाणी पहावयास मिळत आहे. मंडोळी रोड वरील भवानीनगर परिसरात पावसाबरोबरच ड्रेनेजचे पाणीही रस्त्यावरून वाहत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
सध्याच्या पावसामुळे शहरातील ठिकठिकाणीच्या अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांवरील खाचखळग्यांमध्ये गढूळ पाणी साचण्याबरोबरच रस्ते चिखलानी माखून गेले आहेत.
गुड शेठ रोड त्यावर देखील मनपाच्या वतीने मोठे मोठे खड्डे काढण्यात आलेले आहेत रस्त्याचे काम सुरू आहे मात्र अद्याप काम पूर्ण झाले नसल्याने लोकांना याचा त्रास होत आहे.बेळगाव शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरू होऊन जवळपास सहा वर्षे उलटली तरी देखील योजना अपूर्णच आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून संत मीरा शाळा अनगोळ या रस्त्याच्या कामाची खुदाई झाली मात्र काम अद्याप अपूर्ण आहे. पावसाळ्यात या रस्त्याची झालेली गत पाहिल्यास बेळगाव हे सुंदर नाही तर भकास शहर म्हणून त्याची गणना करू नये असा प्रश्न विचारला जात आहे.
खड्डे पडून दुर्दशा झालेल्या रस्त्यावरून वाहने चालविणे वाहन चालकांसाठी कसरतीचे ठरत आहे. शहरातील स्मार्ट सिटीच्या बहुतांश अर्धवट विकास कामांमुळे सध्या शहराची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये महापालिका आणि बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.