बेळगाव लाईव्ह : गेल्या आठवड्यात गाजलेल्या हिरेकुडी येथील जैन मुनींच्या हत्येचे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. बेळगाव जिल्ह्यातील जैनमुनी नंदी कामकुमार स्वामीजी यांच्या हत्येचे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
नंदी कामकुमार स्वामी हे जैन मुनी ६ जुलै रोजी सकाळपासून आश्रमात दिसले नाहीत. यानंतर भक्तांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. यासंदर्भात चिक्कोडी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
शुक्रवारी रात्री पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तपासादरम्यान रायबाग तालुक्यातील कटकबावी गावाच्या हद्दीत जैन मुनीचा मृतदेह बोअरवेलमध्ये फेकल्याची माहिती आरोपींनी दिली होती. पोलिसांनी मृतदेह शोध मोहीम त्याचदिवशी रात्रीपासून हाती घेतली आणि यावेळी जैन मुनींच्या शरीराचे अवयव कापडात बांधून बोअरवेलमध्ये फेकण्यात आल्याचे उघड झाले. २० फूट खोल बोअरवेलमध्ये जैन मुनींच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक टप्प्यात जैन मुनींची हत्या हि आर्थिक व्यवहारातून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.
याप्रकरणी हिरेकोडी गावातील नारायण माळी आणि हुसेन दलायत यांना खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.