गेल्या आठवड्यापासून बेळगाव शहर परिसरात सुरू असलेल्या पावसाने काल रविवारी सकाळपासून मुसळधार हजेरी लावल्यामुळे बळ्ळारी नाला परिसरात पाणीच पाणी होऊन पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या नाल्याचे पाणी शिवारांमध्ये घुसून हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे.
बळ्ळारी नाल्याला आलेल्या पुरामुळे येळ्ळूर शिवार, वडगाव शिवार, अनगोळ शिवार, येरमाळ रोड शिवार, जुने बेळगाव शिवार ही शहर परिसरातील शिवार सध्या पाण्याने तुडुंब भरली आहेत. शहरातील बी. एस. येडीयुराप्पा रोडपर्यंत बळ्ळारी नाल्याच्या पुराचे पाणी आले आहे.
या ठिकाणच्या ब्रिज खाली साचलेल्या कचऱ्यामुळे कमी दाबाने पाण्याचा निचरा होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून रस्त्याशेजारील इमारती पुराच्या पाण्याने वेढल्या गेल्या आहेत.
त्यामुळे पाणी ओसरताच ब्रिज खालील केर कचरा व गाळ काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे. बळ्ळारी नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतीला मोठा फटका बसला असून भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे काल बळ्ळारी नाल्याजवळच असणाऱ्या केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर, आनंदनगर, बाळकृष्णनगर या परिसरातील सखल भागात असणाऱ्या घरांमध्ये देखील पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. ज्या घरांमध्ये पाणी शिरले तेथील साहित्य बाहेर काढण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी बळ्ळारी नाल्याला पूर येऊन त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असतो.
यंदाही हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे नुकसान झाले असून आता पुराचे पाणी लवकर ओसरणार नसल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांकडून सरकार -प्रशासनाने बळ्ळारी नाल्याच्या पुराची समस्या कायमची सोडवावी, अशी मागणी केली जात आहे.