बेळगाव लाईव्ह : पाऊस लांबल्याने उन्हाच्या झळा तर तीव्र जाणवतच आहेत मात्र उन्हाच्या झळांसह सध्या नागरिकांना महागाईच्या झळांची तीव्रता अधिक जाणवत आहे. एकीकडे गॅस सिलिंडर, वीजदरवाढ, दैनंदिन गरजेच्या वस्तूत वाढ तर दुसरीकडे पावसाअभावी भाजीपाला पिकत नसल्याने भाजीपाल्याच्या दरात झालेली दुप्पट वाढ सध्या नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचवत आहे.
आज टीम ‘बेळगाव लाईव्ह’ने बाजारपेठेचा फेरफटका मारून भाजीविक्रेते आणि ग्राहकांशी संवाद साधला. यादरम्यान भाजीविक्रेत्यांनी प्रतिकिया देताना, भाजीपाल्याचे दर वधारल्याने ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याचे सांगितले. पावसाअभावी शेतशिवारात भाजीपाल्याचे पीक म्हणावे तसे येत नाही. यामुळे प्रत्येक भाजी महाग झाली आहे. होलसेल मार्केटमधूनच वाढीव दराने भाजीपाला मिळत असल्याने किरकोळ बाजारपेठेत ग्राहकांना देखील वाढीव दरानेच भाजीपाला घेण्याची वेळ आली आहे. कित्येक ग्राहक भाजी विक्रेत्यांशी हुज्जत घालताना दिसत आहेत. एकीकडे उत्पन्न कमी आणि दुसरीकडे खर्च अधिक अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंच्या दराची वाढ ग्राहकांच्या काळजीचे कारण बनले आहे.
पाऊस नाही त्यामुळे पाणी नाही, अनेक ठिकाणच्या विहिरींनी तळ गाठला आहे, पाणी नसल्याने भाजीपाला पिकत नाही आणि परिणामी रोजच्या वापरातील भाजीपाल्याचा दर दुपटीने वाढला आहे. टोमॅटो ४५ते५० रुपये प्रतिकिलो, १६० ते २०० रुपये प्रतिकिलो बिनीस, १२० ते १४० रुपये प्रतिकिलो भेंडी, ४५ ते ५० रुपये कोथिंबिरीची जुडी, २५ रुपये मेथीची भाजी, १२० ते १३० रुपये प्रतिकिलो मिरची अशा पद्धतीने सध्या किरकोळ बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर सुरु आहेत.
भाजीपाला दर वाढल्याने केवळ ग्राहकांच्या खिशालाच कात्री लागत नसून विक्रेत्यांच्या व्यवसायात देखील घट झाल्याचे यावेळी भाजी विक्रेत्यांनी सांगितले. भाजीपाल्याचे दर वाढल्याने ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली आहे. व्यवसाय मंदावल्याने आपल्या व्यवसायावर देखील परिणाम झाला असून उत्पन्नात देखील घट झाली आहे. आपले कुटुंबही भाजीविक्रीवरच चालते. यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा खर्च उचलणे आपल्यालाही कठीण होत असल्याचे यावेळी भाजीविक्रेत्या संगीता यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना सांगितले.
एकंदर परिस्थिती पाहता महागाईने आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना दररोज नवनव्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झालेली भरमसाठ वाढ नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी ठरत आहे. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशा परिस्थितीत सध्या सर्वचजण मार्गक्रमण करत असून आता वरुणराजाने थोडीशी साथ दिली तर या आर्थिक संकटातून वाट काढता येईल, अशी प्रतिकिया भाजीविक्रेत्यांसह नागरीकातून व्यक्त होत आहे.