अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या गुरुवारी 22 जून रोजी अमेरिकेच्या संसदेत भाषण होणार आहे. त्यावेळी अमेरिकन काँग्रेसमधील भारतीय वंशाचे खासदार बेळगावचे सुपुत्र श्री ठाणेदार यांना पंतप्रधानांना एस्कॉर्ट करण्याचा सन्मान मिळाला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या सन्मानार्थ अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये शाही भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला खासदार श्री ठाणेकर यांना सपत्नीक निमंत्रण देण्यात आले आहे.
अशा पद्धतीने अमेरिकेतील मिशिगन (13 वा जिल्हा) या मतदारसंघातून अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात लोकप्रतिनिधी खासदार म्हणून डेमोक्रॅटिक पक्षाच्यावतीने निवडून गेलेल्या एखाद्या प्रतिनिधीला शाही भोजनाचे निमंत्रण मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या गुरुवारी अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी गृहात संयुक्त बैठकी समोर भाषण होणार असून असे भाषण देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असणार आहेत.
यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी 2016 मध्ये अमेरिकन काँग्रेसला संबोधित केले होते. यावेळी त्यांना अमेरिकन काँग्रेसमन श्री ठाणेदार यांची साथ लाभणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा एक भाग होण्यासाठी श्री अतिशय उत्सुक आहेत.
डाॅ. श्री ठाणेदार यांच्या यशस्वी कारकीर्दीचा शुभारंभ बेळगावातील मिरापूर गल्ली, शहापूर येथून झाला. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील सहा भावंडांमध्ये लहानाचे मोठे झालेल्या ठाणेदार यांना तरुण वयात शिक्षणाचे महत्त्व कळाले आणि आर्थिक स्वातंत्र्याची गरज लक्षात आली.
बेताची परिस्थिती असतानाही त्यांची आई सुलोचना यांनी त्यांच्यावर अतिशय उत्तम संस्कार केले जे त्यांना आयुष्यभर मार्गदर्शक ठरले. अनेक अडचणींचा सामना करत बेळगावमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणाऱ्या श्री यांनी 1977 मध्ये मुंबई विद्यापीठाची मास्टर्स डिग्री संपादन केली. त्यानंतर ॲक्रोन विद्यापीठातून पॉलिमर केमिस्ट्री विषयात पीएचडी पदवी संपादन करण्यासाठी 1979 मध्ये ते अमेरिकेत स्थलांतरित झाले. सदर पीएचडी पदवी 1982 मध्ये संपादन केल्यानंतर त्यांनी 1982 ते 1983 पर्यंत मिशिगन विद्यापीठात पोस्ट -डॉक्टरल स्कॉलर म्हणून काम केले. पुढे पॉलिमर सिंथेसिस केमिस्ट्रीमध्ये तज्ञ असल्यामुळे श्री ठाणेदार यांनी 1984 ते 1990 पर्यंत पॉलिमर सिंथेसिस केमिस्ट आणि सेंट लुईस येथील पेट्रोल लाईट कार्पोरेशनमध्ये प्रकल्प प्रमुख म्हणून काम केले. त्यानंतर 1990 मध्ये त्यांनी अवघ्या तीन कामगारांना हाताशी धरून केमीर नावाची सर्व्हिस कंपनी सुरू केली. ज्या कंपनीचे रूपांतर कालांतराने वटवृक्षात झाले. आज त्या कंपनीचे 400 कामगार असणाऱ्या आणि 63 कोटी डॉलर वार्षिक विक्री असणाऱ्या भरभराटीच्या व्यवसायात झाले आहे.
आपल्या कारकिर्दीत श्री ठाणेदार यांनी एकूण आठ विविध व्यवसाय खरेदी केले आणि विकले. अडचणीत डबघाईला आलेल्या कंपन्या पुन्हा भरभराटीला आणण्यात श्री ठाणेदार यांचा हातखंडा आहे. श्री यांची यशस्वी जीवन वाटचाल ही चिकाटी आणि दृढनिश्चयाचे उत्तम उदाहरण आहे. जीवनात अनेक आव्हाने आली तरी त्यांनी हार न मानता अविरत परिश्रम घेत यशाचे शिखर गाठले. श्री ठाणेदार यांनी स्वतःवर लिहिलेल्या “ही श्री ची इच्छा” या पुस्तकात त्यांच्या अविश्वासनीय जीवन प्रवासाची माहिती वाचायला मिळते.