टिळकवाडी येथील नानावाडीकडे जाणाऱ्या मेजर रामस्वामी अव्हेन्यू रोड या रस्त्याच्या विकासाचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराने सदर रस्त्याशेजारील झाडांची जमीन बुंध्याच्या चारही बाजूने सिमेंटीकरण करून सीलबंद केली असून या उरफाट्या प्रकारामुळे त्या झाडांचे भवितव्य धोक्यात आले आहे. झाडांचे उच्चाटन करण्याच्या या नव्या क्लुप्तीमुळे पर्यावरण प्रेमींमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
टिळकवाडी येथील नानावाडीकडे जाणाऱ्या मेजर रामस्वामी अव्हेन्यू या रस्त्याचा विकास साधण्यात आला आहे यासाठी रस्त्याच्या काही भागासह पदपथावर पेव्हर्स घालण्यात आले आहेत.
हे करताना त्या ठिकाणी असलेल्या झाडांच्या बुंध्याखालील जमीन जलसिंचनासाठी मोकळी ठेवण्यात आली होती. मात्र गेल्या एक-दोन दिवसात संबंधित कंत्राटदाराने मोकळी असलेली ती झाडाखालची जमीन सिमेंट घालून पूर्णपणे बंद केली आहे. या उरफाट्या कृतीमुळे संबंधित झाडांना पाणी कसे मिळणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच वृक्षतोडीला विरोध होत असल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोकांकडून झाडांचे उच्चाटन करण्यासाठी ही नवी क्लुप्ती तर लढविली जात नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
शहरातील झाडांच्या संवर्धनासाठी त्यांच्या आसपासची किमान 1.25 मी. लांबी रुंदीची जागा मोकळी ठेवायला हवी. त्या जागेचे सिमेंटीकरण केले जाऊ नये जेणेकरून झाडांच्या मुळांना पाणी आणि हवा मिळू शकेल. जर झाडाच्या सभोवती वरील प्रमाणे सिमेंट करण केल्यास पाणी व हवा न मिळाल्यामुळे मुळांचे नुकसान होईल आणि पर्यायाने झाड आपोआप मृत होईल.
मात्र सदर मृत झाडे वादळी पावसात रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांसाठी धोकादाय ठरू शकतात. दरम्यान, मेजर रामस्वामी अव्हेन्यू रोडवरील झाडांच्या ठिकाणी करण्यात आलेल्या सिमेंटीकरणाबद्दल वृक्ष व पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून हे सिमेंटीकरण तात्काळ हटवून संबंधित झाडांचा जीव वाचवावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.