शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यामुळे बस पास वितरण कधीपासून होणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून राहिलेले असताना वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाने याबाबत खुलासा करताना 15 जूनपर्यंत विद्यार्थ्यांचे जुने पास सर्व बसेसमध्ये चालणार असल्याचे तसेच नवे बसपास वितरणाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरवर्षी 1 जूनपासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी बसपास वितरण प्रक्रिया सुरू होते. तथापि यंदा शासनाने 31 मेपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ केल्यामुळे परिवहन मंडळाने बस वितरणाचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र यामुळे विद्यार्थ्यांसमोर बसपासचा पेच निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांमधील ही साशंकता दूर करताना परिवहन मंडळाने मागील शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी विद्यार्थ्यांना जे बसपास वितरित करण्यात आले होते, त्याच जुन्या बस पासवर इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवास करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नूतन बसपास वितरणाची तारीख अल्पावधीतच जाहीर केली जाणार आहे.
यंदा विद्यार्थ्यांना सेवा सिंधू पोर्टलद्वारे ऑनलाईन बसपास अर्ज दाखल करावे लागणार आहेत. नजीकच्या सामान्य सेवा केंद्रावर (सीएससी) किंवा ग्राम वन केंद्रातून सेवा सिंधू पोर्टलद्वारे बसपाससाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. अर्ज अपलोड करताना त्यासोबत चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 सालात शालेय शैक्षणिक शुल्क भरलेली पावती, आधार क्रमांक, आपला फोटो जोडणे आवश्यक आहे.