दूरवरुन आलेले कांही लोक आपल्या अख्ख्या कुटुंबासोबत वणवण भटकत काबाड कष्ट करून पोटाची खळगी भरत असतात. अशाच एका कुटुंबातील लहान मुलांमध्ये सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील यांनी कांही आनंदाचे क्षण फुलवले.
एका लग्न समारंभासाठी जात असताना खानापूर तालुक्यातील बीडी रस्त्यावर सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील आणि त्यांचे सहकारी समाजसेवक संदीप परब यांना बेकवाड येथे रस्त्याकडेला दूरवर शेतामध्ये रिमझिम पावसात एका छोट्याशा झोपडीत एक आजीबाई बसलेली दिसली.
तेंव्हा त्या वृद्धीची चौकशी करण्यासाठी त्या उभयतांनी झोपडीकडे जाऊन आत डोकावून पाहिले असता झोपडीत आजी समवेत 8 -10 छोटी छोटी मुले देखील होती.
त्या सर्वांची विचारपूस करून विठ्ठल पाटील यांनी त्या मुलांना आपल्याकडील खाऊ आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या दिल्या. पाण्याच्या बाटल्या आणि खाऊ घेताना त्या मुलांचा चेहरा आनंदाने उजळला.
या पद्धतीने त्या गरीब कुटुंबामध्ये कांही क्षण आनंदाचे फुलवून सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील व संदीप परब माघारी परतले.