बेळगाव लाईव्ह : शहर आणि परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सरकारने कचरा प्रकल्प हाती घेतला आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी विशेष अशी योजनाही आखली आहे.
आपल्या आजूबाजूला कुठेही कचरा पसरू नये, परिसर स्वच्छ रहावा, कचऱ्यामुळे कोणत्याही समस्या उद्भवू नयेत यासाठी सरकारने योजना कार्यान्वित केल्या आहेत.
मात्र सरकारी योजनांना सरकारी बाबू आणि नागरिकांकडून नेहमीच हरताळ फासला जातो याचा वेळोवेळी प्रत्यय येतच असतो. बेळगावमध्ये सध्या कचऱ्याची समस्या जटील बनत चालली आहे.
आणि परिसरात ठिकठिकाणी अनेक नागरिक सहजपणे कचरा भिरकावताना दिसून येतात. कोपरा, निर्मनुष्य ठिकाण, झाड-झुडुपांसह अनेक ठिकाणी स्वतःला सुजाण म्हणवणारे नागरिक कचरा भिरकावताना दिसतात.
प्रत्येकाच्या दारात सकाळी कचरा उचल करणारे वाहन येते मात्र शहरात सर्रास असे प्रकार होताना दिसून येतात. यातच भर म्हणून आता स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही कचऱ्याच्या समस्येत भर घालण्याचा विडा उचलला आहे, असे दिसून येते.
पावसाळ्याच्या तोंडावर शहर परिसरातील गटारी स्वच्छ करण्यात येत आहेत. पावसाचे पाणी साचून रस्त्यावर येऊ नये यासाठी गटारींची स्वच्छता करण्यात येत आहे. मात्र गटारींची स्वच्छता झाल्यानंतर गटारीतील कचरा रस्त्यावर टाकण्यात आल्याचा प्रकार गणपत गल्ली, खडे बाजार, शनिवार खूट येते आढळून आला आहे. गटारीतील गाळ काढून रस्त्यावर टाकण्यात आल्याने घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
यासंदर्भात आसपासच्या व्यावसायिकांनी आणि विक्रेत्यांनी तक्रार करूनही याची दखल घेण्यात आली नाही. कचऱ्याच्या बाजूने बॅरिकेड्स लावण्यात आले असून खडे बाजार ते गणपत गल्ली कॉर्नरचा मार्ग अर्ध्या बाजूने वाहतुकीसाठी बंद असल्याचे दिसून येत आहे.
या समस्येकडे संबंधितांनी तातडीने लक्ष पुरवून स्वच्छता करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.