बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. कोल्हापूर, सांगली येथे होणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यक्रमात ते सहभाग घेणार असून पुणे बारामती होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याहस्ते धनगर समाजाच्यावतीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सत्कार समारंभ आयोजिण्यात आला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्षतेची ताकद दाखवून देत, देशाच्या राजकीय वातावरणात बदल घडवून आणण्यासाठी सिद्धरामय्या यांचे नेतृत्व सहकार्य करेल अशी आशा निर्माण झाली असून कर्नाटकातील निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले आहेत.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिध्दरामय्यांचा सत्कार समारंभ आयोजिण्यात आला असल्याचे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद न्यायप्रविष्ट असून अंतिम टप्प्यात आहे. शिवाय महाराष्ट्र-कर्नाटक पाणी लवाद देखील मोठ्या चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर राजकारणी म्हणून परिचित असणाऱ्या शरद पवार यांच्याहस्ते कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार आयोजिण्यात आला
असून या सत्काराच्या आणि महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीमाप्रश्न आणि पाणी लवादाबाबत काही चर्चा होईल का? याबाबत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी शरद पवार सकारात्मक चर्चा करून काही सकारात्मक गोष्टी घडतील का? असे प्रश्न सध्या सीमाभागात उपस्थित होत आहेत.