आत्ताचं जग प्रामाणिकतेच राहिलं नाही असं म्हटलं जात असलं तरी समाजात अद्यापही प्रामाणिकपणा जिवंत आहे हे दाखवून देताना रस्त्यावर सापडलेले महत्त्वाची कागदपत्रे असलेले पैशाचे पाकीट दोघा जणांनी मूळ मालकाकडे सुखरूप परत केल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली.
याबाबतची माहिती अशी की, चव्हाट गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक प्राचार्य आनंद आपटेकर हे आज शुक्रवारी दुपारी खरेदीसाठी बाजारात केले होते. त्यावेळी शनिवार खूट, काकती वेस रोड या दरम्यान आपल्या खिशातील पैशाचे पाकीट रस्त्यावर पडले हे आपटेकर यांच्या लक्षात आले नाही. ते ज्या वेळी घरी परतले त्यावेळी त्यांना एका निनावी व्यक्तीचा फोन आला.
त्याने प्रथम आनंद आपटेकर यांना त्यांचे नाव विचारले. आपटेकर यांनी आपले नांव सांगितल्यानंतर त्या व्यक्तीने तुमचे रस्त्यावर पडलेले पैशाची पाकीट आम्हाला सापडले आहे अशी माहिती दिली. मी संतोष कंग्राळकर बोलतोय पाकिट सापडलेल्या ठिकाणीच आपण थांबलो आहोत ओळख पटवून पाकीट घेऊन जावे, असे त्या व्यक्तीने सांगितले.
तेंव्हा प्राचार्य आनंद आपटेकर यांनी शनिवार खूट येथे जाऊन आपले पैशाचे पाकीट ताब्यात घेतले. चौकशीअंती कंग्राळी गल्ली येथील संतोष कंग्राळकर या युवकांसह तेथेच रस्त्यावर केळी विकणाऱ्या धारवाडच्या रुद्राप्पा बेटगेरी या विक्रेत्यास आपटेकर यांचे रस्त्यावर पडलेले पैशाचे पाकीट आढळून आले होते. आपटेकर यांच्या पाकिटामध्ये रोख 3400 रुपये, बँकांची एटीएम कार्ड, ओळखपत्र, ओरिजनल आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदींसह अन्य कांही महत्त्वाची कागदपत्रे होती.
पैशासह सर्व साहित्य सुरक्षितपणे परत मिळाल्याबद्दल उपरोक्त दोघांचेही प्राचार्य आनंद आपटेकर यांनी आभार मानून धन्यवाद दिले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दीपक पावशे आणि माजी एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव उपस्थित होते. पैशापेक्षा पाकिटातील एटीएम कार्डांसह अन्य कागदपत्रे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची होती, अशी प्रतिक्रिया प्राचार्य आपटेकर यांनी यावेळी व्यक्त केली.