कर्नाटकातील काँग्रेस सरकारने जाहीर केलेल्या पाच गॅरंटी योजनांपैकी शक्ती योजने मागोमाग काल रविवारपासून सुरू झालेल्या ‘गृहज्योती’ या दुसऱ्या योजनेच्या नांव नोंदणीसाठी सध्या बेळगाव वन केंद्रामध्ये नागरिकांची तोबा गर्दी झालेली पहावयास मिळत आहे.
घरगुती वीज जोडणी असणाऱ्या ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देणाऱ्या गृहज्योति योजनेच्या नांव नोंदणीला शहरात काल रविवारी दुपारी प्रारंभ झाला आहे. सदर योजनेसाठीची नांव नोंदणी शहरातील बेळगाव वन कार्यालयामध्ये करावी लागणार असल्यामुळे सध्या या कार्यालयात लाभार्थी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. आधार कार्ड, आरआर नंबर, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल घेऊन सदर केंद्रामध्ये नागरिकांच्या रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहेत.
सेवा सिंधू वेबसाईटवर बेळगाव वन कार्यालयांमध्ये ग्राहकांची माहिती भरून घेतली जात आहे. मात्र ही प्रक्रिया म्हणावी तशी वेगाने सुरू नसल्यामुळे नागरिकांवर ताटकळत थांबण्याची वेळ आली होती. काल कांही जणांचे आधार कार्ड वरील नांव आणि वीज मीटरवरील नांव यामध्ये तफावत असल्यामुळे नांव नोंदणी रद्द होऊन तासभर रांगेत थांबलेल्या या नागरिकांवर नोंदणी न करताच घरी माघारी परतण्याची वेळ आली होती. गृहज्योती नांव नोंदणीसाठी ज्या व्यक्तीच्या नावावर विद्युत मीटर आहे, त्या व्यक्तीचाच आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडलेला असणे आवश्यक आहे. यामुळे काल रविवारी अनेकांना माघारी फिरावे लागले. नांव नोंदणी यशस्वी झालेल्या ग्राहकांकडून 20 रुपये शुल्क आकारून पोचपावती देण्यात येत आहे. गृह ज्योति योजना रविवारी सकाळी 11 वाजता सादर करण्यात आल्यानंतर कांही क्षणातच बेळगाव वन केंद्रातील सेवा सिंधू पोर्टलचा सर्व्हर डाऊन झाला. मोठ्या संख्येने लाभार्थी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे आल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे अर्ज प्रक्रियेत कांही काळ अडथळा निर्माण झाला. सर्व्हर सुरळीत करण्यासाठी अधिकाऱ्यांना तांत्रिक तंत्रज्ञांना पाचारण करावे लागले होते.
या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव म्हणाले की, सरकारने सुरू केलेल्या गृहज्योती योजनेचा जनमानसांना सध्या म्हणावा तितका फायदा होत नाही आहे. कारण कर्नाटक वन ला लॉगिन दिल्यामुळे एकच ठिकाणी गर्दी होत आहे. यात भर म्हणून ऑपरेटर मंडळी सर्व्हरची समस्या सांगत आहेत. तेंव्हा सरकारने सर्वप्रथम या केंद्रातील सर्व्हरची समस्या सोडवावी. तासनतास रांगेत उभे राहण्याची अथवा चक्कर येऊन पडण्याची वेळ लोकांवर न आणता सुलभपणे घरबसल्या गृह ज्योतीचे अर्ज भरून घेतले जातील याकडे सरकारने लक्ष द्यावे. कारण सध्या लोकांना आपले कामधंदे सोडून अर्ज भरण्यासाठी कर्नाटक वन केंद्रात यावे लागत आहे. एखादी योजना जाहीर करणे फार मोठे नाही. मात्र ती सर्वसामान्य तळागाळापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असते. याचा विचार करून आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरबसल्या योजनेचे अर्ज भरण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून द्यावी. सरकारने जाहीर केलेल्या गॅरंटी योजनांच्या अनुषंगाने आता एजंटांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. ते लोकांकडून 500 ते 1000 रुपये उकळत आहेत. सरकार याकडेही जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असा आरोप करून सरकारने ज्या कंपनीचे नेटवर्क आहे. त्याच कंपनीकडून सर्व्हरची व्यवस्था करून घेण्याद्वारे सर्व्हर डाऊनची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, असे मत जाधव यांनी व्यक्त केले.
एका काँग्रेस समर्थकाने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना लोकांनी एकाच वेळी बेळगाव वन केंद्रात इतकी प्रचंड गर्दी करणे कांहीच गरजेचे नाही. नांव नोंदणीसाठी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया एक-दोन दिवसात संपणार नाही, ती बराच काळ चालणार आहे. तेंव्हा लोकांनी संयम बाळगावा. कारण जसे दिवस जातील तशी गर्दी कमी होईल असे सांगितले. त्याचप्रमाणे आपल्या योजना लोकांपर्यंत सुलभपणे पोहोचाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि लवकरच त्यासाठी नवे मोबाईल ॲप उपलब्ध केले जातील. कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जे सेवा सिंधू ऑपरेटर्स आहेत त्यांचीही मदत घेतली जाईल, अशी माहिती देखील त्याने दिली.
“गृहज्योती”साठी पहिल्या दिवशी 55 हजार लाभार्थी
कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या गृहज्योती योजनेसाठी काल रविवारी पहिल्या दिवसाअखेर राज्यभरात एकूण 55000 लाभार्थींनी नांव नोंदणी केली आहे. गृहज्योति योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन द्वारे अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थीना सेवा सिंधू पोर्टल मधील खास डिझाईन केलेल्या वेब पेजवर लॉगिन करावे लागणार आहे. या माध्यमातून काल पहिल्या दिवशी राज्यात 55 हजार ग्राहकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. जास्तीत जास्त लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी रविवारी सुट्टी दिवशी देखील नांव नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे.