बेळगाव लाईव्ह : अवकाळी पावसासह मान्सून ने देखील दडी मारल्याने बेळगाव परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे. बेळगाव परिसरातील ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी तयारी सुरु केली आहे. मात्र जून महिना अर्धा उलटून देखील पावसाचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात वळिवाची हजेरी लागते. त्यानंतर जून महिन्यापासून पावसाला सुरुवात होते. या वेळापत्रकानुसार नेहमीप्रमाणे खरीप हंगामात येणाऱ्या भातपिकांची पेरणी शेतकरी वर्गाने केली आहे.
बेळगाव आणि परिसरात भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यात प्रामुख्याने बासमती, इंद्रायणी, सोनम अशा पिकांचा समावेश असतो. या वर्षी वळिवणेही म्हणावी तशी हजेरी लावली नाही. मे महिन्यात झालेल्या वळिवाच्या पावसानंतर जून महिन्यात पाऊस येईल या आशेने शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणी केली आहे. मात्र मे महिना उलटून जून महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप पावसाची हुलकावणीच मिळाल्याने शेतकरी चिंतेच्या वातावरणात आहे. ज्या ठिकाणी कूपनलिका किंवा पाण्याची इतर व्यवस्था आहे ते शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नाही त्या शेतकऱ्यांची पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
धूळवाफ पेरणी केल्यानंतर काही अंशी पिके उगवली आहेत. शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी सुमारे १५ हजार रुपयांचा खर्च येतो. तर लावणीसाठी ४० ते ५० हजारांच्या घरात खर्च येतो. आधीच डोक्यावर संकटांची टांगती तलवार आणि पावसाने दिलेली हुलवानी यामुळे शेतकरी अधिक आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.
येत्या चार ते पाच दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागणार असून नव्या सरकारने शेतकऱ्यांना दिलासा म्हणून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
यंदाची धुळवाफ पेरणी अयशस्वी?https://t.co/tsuK0IEkjd pic.twitter.com/ThR3CDXmDq
— Belgaumlive (@belgaumlive) June 14, 2023