बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत बेळगाव मध्ये विविध ठिकाणी उड्डाणपुलांचा प्रस्ताव मांडला आहे. महामार्गावरून शहरात प्रवेश करणाऱ्या केएलइ मार्गापासून संकम हॉटेल, अशोक सर्कल ते पिरनवाडी, ओल्ड गांधीनगर ते मध्यवर्ती बसस्थानक, चन्नम्मा सर्कल अशा विविध ठिकाणांचा यात समावेश आहे.
नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे बेळगावी शहराची वाहतूक व्यवस्थापनात मोठी सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. या प्रस्तावित प्रकल्पाबाबत सतीश जारकीहोळी यांनी चर्चा केली आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सीबीटीला जोडण्यासाठीच्या उड्डाणपुलावर भर दिला जाईल. त्यानंतर पुढे पिरनवाडी पर्यंत उड्डाणपूल बांधला जाईल. या दरम्यान उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूनी चौक, प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांचाही समावेश असेल.
प्रस्तावित प्रकल्पासाठी १२९ कोटी खर्चाचा उल्लेख असून नव्या महत्वाकांक्षी प्रकल्पात उड्डाणपुलाची रचना सध्याच्या पायाभूत सुविधांना पूरक ठरेल, यावर सतीश जारकीहोळी यांनी भर दिला आहे. सुरुवातीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर पिरनवाडीपर्यंत प्रकल्पाच्या विस्ताराचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. या कामकाजादरम्यान सावधगिरी बाळगूनबांधकाम काळजीपूर्वक केले पाहिजे असेही सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे.
प्रस्तावित उड्डाणपुलाची मंगळवारी उत्तर मतदार संघाचे आमदार आसिफ सेठ आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर अधिकार्यांसमवेत गांधीनगरमधील महांतेश नगरजवळ जागेची पाहणी केली.
राष्ट्रीय महामार्गावरून बेळगाव शहरात प्रवेश करण्यासाठी उड्डाणपूल आणि सर्व्हिस रोड बांधण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे हा या तपासणीचा उद्देश होता. पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी जागेची बारकाईने तपासणी केली आणि प्रकल्पाचे संभाव्य फायदे आणि आव्हाने यावर चर्चा केली. यावेळी रहदारीचा ओघ आणि सुरक्षितता याचप्रमाणे पर्यावरणीय प्रभाव या घटकांचा विचार केला. काल झालेल्या पाहणीनंतर येथील रहिवासी आणि व्यावसायिकांची माहिती गोळा करण्यासाठी आणि उड्डाणपुलाच्या निर्माणादरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात चर्चा केली आहे.
उड्डाणपुलाच्या प्रस्तावानंतर आता बेळगाव शहरात पुन्हा नवे उड्डाणपूल उभारण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु झाले असून येत्या वर्षभरात शहरात विविध ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नव्या सरकारातील मंत्रीमहोदय प्रयत्नशील असणार आहेत.
ही देखील न्युज वाचा