बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयात केवळ अर्धा फूट पाणी शिल्लक राहिल्याने येत्या आठवड्याभरात डेड स्टॉक देखील तळ गाठण्याची शक्यता आहे. शहराचा पाणी प्रश्न आधीच ऐरणीवर असून आता पावसाच्या गैरहजेरीमुळे बेळगावकरांवर पाणी टंचाईचे सावट ओढवण्याची शक्यता आहे.
आज बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार राजू सेठ यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला असून बेळगाव शहरात १०० नवीन बोअरवेल मंजूर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शहरवासीयांचे पाण्याअभावी होत असलेले हाल पाहता खबरदारीचा उपाय म्हणून शहरात १०० नवीन बोअरवेल बसविण्याची विनंती केली आहे.
याबाबत आम. असिफ (राजू) सेठ यांनी बेळगावकरांना आवाहन केले आहे.बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना खुल्या विहिरी स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या असून बेळगावकरांनी पाण्याची काळजी करू नये,
१०० नवीन बोअरवेल खोदण्यात येत असून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. जनतेने कोणत्याही अफवांवर ऐकू नये. शहरवासीयांना पाण्याची समस्या उद्भवू नये यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाव शहरात हजारो खासगी बोअरवेल आणि विहिरी आहेत. ज्यांच्याकडे खाजगी बोअरवेल आहेत त्यांनी आपापल्या भागात जनतेला पाणी द्यावे, तसेच ज्यांच्याकडे खाजगी बोअरवेल आहेत त्यांनी पाण्याची समस्या असताना सहकार्य करावे, अशी विनंती आमदार असिफ (राजू) सेठ यांनी केली आहे.