बेळगाव शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरातच चार नवे प्रकल्प सुरू करण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली असून त्यामुळे चुरमुरी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पावरील ताण कमी होणार आहे. या नव्या प्रकल्पांमुळे तुरमुरे येथील प्रकल्प कदाचित बंद होण्याची शक्यता असून यामुळे तुरमुरीवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बेळगाव महापालिकेमध्ये काल झालेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चार नवे प्रकल्प कुठे? व कसे? तयार करता येतील याचा आराखडा तयार करण्याची सूचना महापालिका प्रशासनाला दिली आहे. तसेच पुढील आढावा बैठकीमध्ये नव्या प्रकल्पांचा आराखडा सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बेळगाव ग्रामीण भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प कशासाठी? असा सवालही मंत्री जारकीहोळी यांनी केला आहे. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीच्या प्रकल्पासाठी शासकीय जागा मिळत असेल तर शोध घ्या. एखादी व्यक्ती आपल्या मालकीची जागा देण्यास तयार असेल तर ती जागा घ्यावी. मात्र शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरांमध्येच चार भागात चार कचरा प्रकल्प झाले पाहिजेत. महापालिकेने याकडे विशेष लक्ष द्यावे अशी सूचना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.
गेल्या डिसेंबर 2006 पासून तुरमुरे येथे कचरा प्रकल्प सुरू आहे. मात्र त्यामुळे नागरिकांसह विशेष करून लहान मुले आणि वयोवृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर कचरा डेपोमुळे नरकवास सहन करावा लागत असल्यामुळे त्याच्या विरोधात तुरमुरी ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. महापालिका सर्वसाधारण बैठकीतही याबाबत चर्चा झाली आहे.
बैठकीत तुरमुरी प्रकल्प बंद करण्याचा ठराव देखील झाला होता. तथापि त्या ठरावाची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही. मात्र आता शहरातच नवे चार कचरा प्रकल्प सुरू झाल्यास तुरमुरी येथील कचरा डेपो बंद होण्याची शक्यता असून ही बाब तुरमुरीवासियांसाठी दिलासादायक ठरली आहे.