Saturday, July 27, 2024

/

श्री गंगापूर महाराज मूर्ती, चौकट मिरवणूक उत्साहात

 belgaum

कोरे गल्ली शहापूर येथील श्री गंगापुरी मठ येथे येत्या 26 जून रोजी श्री गंगापुर महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणारा असून चौकट पूजन कार्यक्रम होणार आहे.

या पार्श्वभूमीवर श्री गंगापुरी मठ ट्रस्ट पंचमंडळ आणि श्री गंगापुरी मठ जीर्णोद्धार कमिटी, कोरे गल्ली यांच्यातर्फे आज गुरुवारी सकाळी महाराजांची मूर्ती आणि लाकडी चौकट यांची भव्य सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली.

सदर मिरवणुकीला आज सकाळी 8:30 वाजता बॅरिस्टर नाथ पै सर्कल शहापूर येथील श्री काळभैरव मंदिर येथून प्रारंभ झाला. यावेळी सुशोभित ट्रॅक्टर ट्रेलरमध्ये श्री गंगापुरी महाराजांची सुबक लक्षवेधी मूर्ती आणि लाकडी सागवानी चौकट विराजमान होती.

साखर प्रसाद दाखवून लहान मुलांच्या हस्ते ट्रॅक्टर पूजन करण्याद्वारे मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. नाथ पै सर्कल येथून खडेबाजार दाणे गल्ली, कोरे गल्ली मार्गे गंगापुरी मठ येथे या मिरवणुकीची आता दुपारी सांगता होणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या सनई आणि ताशा पथकासह भजनी मंडळाच्या गजरामुळे ही मिरवणूक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. मिरवणुकीमध्ये कोरे गल्ली येथील आजी-माजी पंचमंडळींसह जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य, बालगोपाळ, युवा वर्ग आणि नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.Gangapuri maharaj

गंगापुरी मठ कोरे गल्ली येथे मिरवणुकीचे आगमन झाल्यानंतर पुरोहितांकडून श्री गंगापूर महाराजांच्या समाधीसह त्यांची मूर्ती व सागवानी चौकटीचे पूजन करून शास्त्रोक्त पद्धतीने जलाभिषेक घातला जाणार आहे त्यानंतर आज दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, कोरे गल्ली शहापूर येथील श्री गंगापूर महाराज मठ हे एक जागृत देवस्थान आहे. 300 वर्षांपूर्वी श्री गंगापूर नावाच्या साधूने येथे जिवंत समाधी घेतली होती. तेंव्हापासून कोरे गल्ली पंचमंडळींकडून दरवर्षी महाराजांचा उत्सव साजरा केला जातो.

आता श्री गंगापूर महाराज समाधीच्या ठिकाणी येत्या 26 तारखेला महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यानिमित्त चौकट पूजन तसेच नव्या वास्तूचे उद्घाटन हे कार्यक्रम देखील होणार आहेत. त्यादिवशी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे, अशी माहिती आजच्या मिरवणुकीच्या प्रारंभी पंचमंडळींकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.