उद्यमबाग येथील राघवेंद्र हॉटेल समोर बेळगाव -खानापूर मुख्य रस्त्याकडेने खोदकाम करून एल अँड टी कंपनीकडून जलवाहिनी घालण्यात आली असली तरी त्यानंतर रस्ता पूर्ववत व्यवस्थित करण्यात आलेला नाही.
त्यामुळे रहदारीसह नागरिकांनाही ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला असून सदर रस्ता त्वरित व्यवस्थित दुरुस्त करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
गेल्या महिन्याभरापूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या एल अँड टी कंपनीकडून उद्यमबाग मुख्य दुपदरी रस्त्यावर राघवेंद्र हॉटेलच्या बाजूने जलवाहिनी घालण्यात आली आहे. सदर 24 तास पाणी पुरवठ्याची जलवाहिनी घालण्यासाठी पिरनवाडी क्रॉसपासून तिसऱ्या रेल्वे गेट जवळील उत्सव हॉटेलपर्यंत रस्त्याकडेने मोठी चर खोदण्यात आली होती.
मात्र आता जलवाहिनी घालून महिना उलटून गेला तरी खोदलेली चर व्यवस्थित बुजवून रस्ता पुर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे परिसरातील व्यावसायिक आणि उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रस्ता पूर्ववत करण्याऐवजी दगड -माती ओढून जलवाहिनीची चर बुजवण्यात आली आहे. परिणामी रस्त्याकडेला असलेला चरीवरील मातीचा ढिगारा जोड रस्त्याच्या ठिकाणी रहदारीस अडथळा ठरत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणच्या हॉटेल दुकाने तसेच अन्य व्यवसायाच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी हा मातीचा उंचवटा त्रासदायक ठरत आहे.
पावसाला सुरुवात झाल्यास या मातीच्या ढिगार्यामुळे निर्माण होणारी चिखलाची दलदल अधिकच मनस्ताप देणारी धोकादायक ठरणार आहे. तरी लोकप्रतिनिधींसह एल अँड टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खोदलेल्या चरीच्या ठिकाणी रस्ता व्यवस्थित दुरुस्त करून पुरवत करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.