Tuesday, March 19, 2024

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

 belgaum

शहर – परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड करण्यात आले आहे. कर्नाटक- महाराष्ट्र सीमेवर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांच्या नेतृत्वाखाली गांजा विक्री करणाऱ्या टोळीला सापळा रचून अटक करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, टोलनाक्यावर चारचाकी वाहन पकडले जाऊ शकते, या कारणास्तव महाराष्ट्रातील स्कुटीद्वारे गांजा आणून तो कर्नाटाकाच्या हद्दीत चोरीछुप्या मार्गाने विक्री करण्यात येत होता. याची माहिती समजताच सीपीआय जावेद मुशाफिरी यांच्या टीमने सापळा रचून गांजाविक्री करणाऱ्या टोळीला अटक केली आहे.

यामध्ये सर्पराज महमदहनीप जमखंडीकर (रा. मिरज, महाराष्ट्र), निहाल इम्तियाज मोमीन, (रा. मिरज, महाराष्ट्र), नागनगौडा शिवलिंगाप्पा पाटील (रा. गद्दिकरीविणकोप्प, बैलहोंगल), आणि मल्लिकार्जुन सिद्दबसप्प आलूर (रा. रामतीर्थनगर, बेळगाव), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.Apmc police

 belgaum

यांच्याकडून ६ किलो २८ ग्रॅम वजनाचा अंदाजे १,२०,००० रुपयांचा गांजा, हिरो होंडा स्प्लेंडर (वाहन क्रमांक केए २२ इक्यू ४४९१), सुझुकी एक्सेस (वाहन क्रमांक : एमएच १०, सी. एच. ३३६६), आणि विना नंबर प्लेट एक सुझुकी एक्सेस वाहन, ५ मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.

या अमली पदार्थांची खरेदी करण्यात कर्नाटकातील एका निवृत्त एएसआयच्या मुलाचा सहभाग असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच खुनाचा आरोप असलेला व्यक्ती अशा व्यापाऱ्यांचा संघ बनवितो अशीही माहिती उपलब्ध झाली आहे. बेळगावसारख्या शहरात अंमली पदार्थांची तस्करी करून विक्री करण्यात येते, आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात येते, याची प्रचिती पोलिसांच्या कारवाईतून येत आहे.

कर्नाटकात अमली पदार्थांचे प्रकरण उजेडात आल्यापासून सर्वत्र गांजाविक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांची मोहीम तीव्र झाली आहे. याची पाळेमुळे केवळ शहरापुरतीच मर्यादित नसून आंतरराज्य पातळीवर असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. राजकारण्यांपासून अनेक मोठमोठ्या व्यक्तींची नावे या प्रकरणी उजेडात येत असून याचा खोलवर तपास करण्याचा विडा पोलिसांनी उचलला आहे.

त्याचीच प्रचिती गेल्या ७ ते ८ दिवसापासून शहरातील जनतेला येत आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलांपासून अनेक बड्या व्यक्तींचा हात असल्याचीही माहिती उपलब्ध होत आहे. या सर्व प्रकरणाची ‘लिंक’ नेमकी कुठे जाऊन पोहोचेल, याचा तपास पोलिसांच्या कारवाईनंतर उघडकीस येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Popular Articles