रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत जवळपास १५ ते २० कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे.
याबाबत संबंधित लोकप्रतिनिधींना अनेकवेळा सूचित केले आहे. परंतु गेल्या वर्षभरात कोणीही येथे फिरकले नाही. या कुत्र्यांच्या जमावाने ये-जा करणाऱ्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडत आहे. याठिकाणी लहान मुले सतत खेळत असतात. त्यांच्या आवाजाने हे कुत्री अंगावर धावून येतात. शिवाय आक्रमकतेने धावून जाणाऱ्या कुत्र्यांमुळे अनेकजण बिथरतात आहेत. या भागात अंधाराचे साम्राज्य असून पादचारी, सायकलस्वार, दुचाकी वाहनावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांपासून जपून रहावे लागत आहे. रात्रीची गोष्ट वेगळीच परंतु दिवसाही या कुत्र्यांमुळे धोका निर्माण झाला आहे.
१५ ते २० कुत्र्यांचा कळप अचानक वेगाने धावून ये-जा करणाऱ्या नागरिकांचा पाठलाग करतात. येथील बंगाळेधारकांनी मोठी कुत्री पाळली आहेत. परंतु या कुत्र्यांना कधीही बांधून ठेवण्यात येत नाही.
मोकाटपणे सोडून देण्यात आलेल्या या कुत्र्यांमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काहीवेळा कुत्री पाळण्यात आलेल्या घर मालकांना सूचनाही देण्यात आली आहे. परंतु कोणाच्याही सांगण्याकडे दुर्लक्ष करत मागील वर्षभर या कुत्र्यांना मोकाट सोडून देण्यात आले आहे.
समर्थ कॉलनीसह गणेशपूर मार्गवरही अनेक चौकात ८ ते १० कुत्र्यांचा जमाव रस्त्यावर मोकाटपणे फिरताना दिसून येत आहे. यामुळे अनेकवेळा दुचाकीचे अपघातही घडले आहेत. ग्रामपंचायतीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, तसेच कुत्र्यांची पाळणूक करणाऱ्या घरमालकांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी येथील स्थानिकांकडून करण्यात येत आहे.