बेळगाव लाईव्ह : दिल्ली येथे सुरू करण्यात आलेल्या ‘मोहल्ला क्लिनिक’च्या धर्तीवर कर्नाटकात देखील ‘आपलं क्लिनिक’ योजना कार्यान्वित करण्यात आली. या माध्यमातून एकाचवेळी बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ११४ रुग्णालये सुरु असून विविध प्रकारच्या १४ आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या आपल्या क्लिनिकच्या माध्यमातून बेळगाव जिल्ह्यात ३,६०८ महिलांनी आतापर्यंत उपचार घेतल्याची नोंद करण्यात आली आहे.
भाजप सरकारच्या काळात १५ डिसेंबर २०२२ रोजी कर्नाटक सरकारने ही योजना सुरू केली होती. या योजनेची अम्मलबजावणी आता काँग्रेस सरकार कशी करेल याबाबत उत्सुकता आहे. आपलं क्लिनिकमध्ये यापुढे टप्प्याटप्प्याने त्या सेवा सुरू होणार असून या योजनेला बेळगावात महिलांकडून सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
शहरात मजगाव व शाहूनगर अशा दोन ठिकाणी ‘आपलं क्लिनिक’ सुरू केले. या दोन्ही ठिकाणी सर्वाधिक उपचार महिलांनीच घेतले असून डिसेंबर महिन्यात ‘आपलं क्लिनिक’ सुरू झाले तेव्हापासून मे अखेरपर्यंत दोन्ही ठिकाणी मिळून ५,५५० रुग्णांची नोंदणी बाह्यरुग्ण विभागात झाली आहे. त्यापैकी ३,६०८ महिला असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली आहे.
आपलं क्लिनिकच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जाते. बेळगाव शहरासाठी पाच क्लिनिक मंजूर झाले असून डिसेंबरमध्ये बेळगावात झालेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या आधी दोन ठिकाणी क्लिनिक सुरू करण्यात आले होते. बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील क्लिनिक मजगाव येथे सुरू झाले. तर उत्तर
मतदारसंघातील क्लिनिक शाहूनगर येथे सुरू झाले. दोन्ही क्लिनिकमध्ये आरोग्य विभागाकडून डॉक्टर व अन्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून तेथे उच्च रक्तदाब व मधुमेहाची तपासणी व उपचारही केले जात आहेत.
मजगाव येथे क्लिनिक सुरू झाल्यापासून येथील ओपीडीमध्ये तीन हजार १३३ जणांची नोंद झाली आहे. तर शाहूनगर येथील क्लिनिकमध्ये दोन हजार ४१७ जणांनी उपचार घेतले आहेत. या दोन्ही क्लिनिकला भेट देऊन उपचार घेतलेल्या पुरुष रुग्णांची संख्या केवळ एक हजार ९४२ इतकी आहे. या दोन्ही क्लिनिकमध्ये उच्च रक्तदाबाचे उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. या आजारावर उपचार घेणाऱ्यांमध्ये महिलांचीच संख्या अधिक आहे. डिसेंबर ते मे या काळात दोन्ही क्लिनिकमध्ये मिळून ८०२ जणांनी उच्च रक्तदाबावरील उपचार घेतले आहेत. त्यातील महिलांची संख्या ५५७ इतकी आहे.