बेळगावात विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनात भाग घेण्यासाठी शिवापूरहून बेळगावकडे येणाऱ्या प्रवाशांच्या अल्टो कारने समोर निघालेल्या कंटेनरला मागून धडक दिल्यानंतर कारला तिच्या मागून येणाऱ्या दुसऱ्या एका कंटेनरने जबरदस्त धडक दिल्यामुळे होनगा नजीक बेन्नाळी पुलावर घडलेल्या भीषण तिहेरी अपघातात कार मधील दोघे जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.
आज शनिवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घडलेला हा अपघात इतका भयानक होता की दोन टँकरमध्ये सापडलेल्या कारचा पूर्णपणे चेंदामेदा झाला. दैव बलवत्तर म्हणून शिवापुर मठाचे श्री काड सिद्धेश्वर स्वामीजी या अपघातातून बचावले आहेत.
सदर अपघातात जागीच ठार झालेल्यांची नावे अशी आहेत नांव पांडुरंग मारुती जाधव रा. बचणी तालुका करवीर कोल्हापूर महाराष्ट्र(वय 60 वर्षे,) तर पांचाक्षरय्या बसय्या हिरेमठ वय 32 रा. बसरिकट्टी तालुका हुक्केरी असे आहे.
सदर अपघातात दैव बलवत्तर म्हणून कारमधील मुपीनमठ श्री काड सिद्धेश्वर स्वामीजी शिवापूर बचावले असले तरी गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच काकतीचे पोलीस निरीक्षक विजय शिन्नूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले.
अपघातग्रस्त झालेले सर्वजण बेळगावात आज झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या धर्मांतर बंदी कायदा रद्द विरोधी आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोल्हापूरहून निघाले होते. सदर अपघाताची काकती पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे