यंदा मान्सून प्रदीर्घ लांबल्यामुळे हुक्केरी तालुक्यातील हिडकल जलाशयाची पाणी पातळी अतिशय खालावली असून ते रिकामी होण्याच्या मार्गावर आहे. सध्या 51 टीएमसी क्षमतेच्या या जलाशयामध्ये पावसा अभावी फक्त 2 टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे.
गेल्या 10 वर्षाच्या इतिहासात या पद्धतीने पहिल्यांदाच हिडकल जलाशय (डॅम) रिकामी होण्याच्या मार्गावर आहे.
सध्या या जलाशयात शिल्लक असलेल्या 2 टीएमसी पाणी साठ्यामधून बेळगाव शहर, हुक्केरी आणि संकेश्वर गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची कसरत पाणी पुरवठा खात्याला करावी लागत आहे.
जलाशयातील पाणी साठ्यात चिंताजनक घट झाल्यामुळे सध्या या जलाशयातून कृषी क्षेत्रासाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
एकंदर परिस्थिती पाहता जर या आठवड्याभरात पुरेसा समाधानकारक पाऊस झाला नाही तर हिडकल जलाशयातून बेळगाव शहरासह अन्य गावांना होणारा पाणी पुरवठा देखील बंद होणार आहे. रिकाम्या होत असलेल्या या जलाशयाचा तळ सध्या एखाद्या खेळाच्या प्रशस्त मैदानाप्रमाणे भासत आहे.