कॅम्प येथील शांतेशा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामाला आग लागून सुमारे 10,000 रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी 9:45 वाजण्याच्या सुमारास घडली. आगीत फक्त वेस्ट मटेरियल जळाले असून सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
शहरातील कॅम्प परिसरात शांतेशा मोटर्स प्रा. लि.चे वर्कशॉप आणि गोदाम आहे. सदर गोदामाला आज सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.
सदर बाब निदर्शनास येताच त्वरेने अग्निशामक दलाला कळविण्यात आले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याच्या बंबा समवेत तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. शांतेशा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे वर्कशॉप व्यवस्थापक बसवराज यांनी दिलेल्या माहितीनुसार गोदामाला लागलेल्या आगीमुळे सुमारे 10 हजार रुपये किमतीच्या साहित्याचे नुकसान झाले आहे.
त्याचप्रमाणे अग्निशामक दलाचे अधिकारी व्ही. एस. टक्केकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आगीत वेस्टेज मटेरियल जळाले असून कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान कॅम्प पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद झाली आहे.