बेळगावच्या सिद्धार्थ साळगावकर या युवा आणि प्रतिभावंत चित्रपट निर्मात्याचा सध्या अमेरिकेतील ‘स्टँड -अप कॉमेडी शो’ क्षेत्रात गवगवा होत आहे. एवढ्यावर न थांबता सिद्धार्थ तेथील चित्रपट सृष्टीतही सक्रिय आहे. सध्या तो आपल्या स्वतःच्या पुढच्या चित्रपट प्रकल्पावर काम करण्याबरोबरच पटकथांचे लिखाण आणि अमेरिकेतील टीव्ही कर्मचाऱ्यांना सहाय्यही करत आहे.
सिद्धार्थ हा बेंगलोर येथील सृष्टी स्कूल ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेचा पदवीधर आहे. इंस्टाग्रामच्या सहयोगाने त्याने तयार केलेल्या एका चित्रपटाची टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी चांचणी झाली होती. आपल्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून त्याने ‘सवंगडी’ हा प्रबंधात्मक चित्रपट बनवला होता. ज्याचे चित्रीकरण त्याने आपले मूळ गांव बेळगावमध्ये केले होते.
सिद्धार्थ साळगांवकर याचे शालेय शिक्षण बेळगावच्या सेंटपॉल हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयान शिक्षण आरएलएस महाविद्यालयात झाले आहे. त्यानंतर त्याने ‘रंगमंच आणि चित्रपटासाठी नाट्यमय लिखाण’ या विषयातील अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदवी जॉर्जिया येथील सावन्ना कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन (एससीएडी) या संस्थेतून संपादन केली.
एससीएडीचा विद्यार्थी असल्यामुळे सिद्धार्थ याने टीव्ही, रंगमंच, व्हीआर, पोडकास्ट, स्केच कॉमेडी आणि इतर या पद्धतीने सर्व प्रकारच्या पटकथा आणि फीचर्सचे लिखाण केले आहे. त्याला सुधारात्मक हास्यप्रधान छोट्या नाटिकांमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली आहे. मागील 2022 मध्ये पदवीधर झाल्यानंतर आपले लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सिद्धार्थ साळगांवकर याने न्यूयॉर्ककडे कुच केले. दरम्यानच्या काळात त्याला स्टॅन्ड -अप कॉमेडी मध्ये रस निर्माण झाला आणि अल्पावधीत या कलेवर देखील त्याने प्रभुत्व मिळविले आहे. सध्या न्यूयॉर्क मधील स्टँड अप कॉमेडी क्षेत्रात त्याचे दररोज फ्री लान्स कार्यक्रम होत असतात. सिद्धार्थची स्टॅन्ड अप कॉमेडी दर्जेदार आणि प्रभावी असल्यामुळे सध्या त्याच्या नावाचा त्या ठिकाणी सर्वत्र गवगवा होत आहे.
स्टँड अप कॉमेडी करण्याबरोबरच न्यूयॉर्कमध्ये सिद्धार्थ स्थानिक टीव्ही कार्यक्रमांसाठी पटकथा लेखनाचे काम देखील करत आहे. त्याचप्रमाणे आपल्या वैयक्तिक भावी चित्रपटाच्या प्रकल्पासाठी देखील तो परिश्रम घेत आहे. सिद्धार्थचे आई-वडील देखील कलाकार आहेत. त्याचे वडील हेमंत साळगांवकर मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रशिक्षण घेतलेले पेंटर असून ज्यांनी अलीकडेच बेळगावमध्ये आपला व्यवसाय सुरू केला आहे. सिद्धार्थची आई सीमा ही मराठी नाट्यसृष्टीतील प्रतिभावंत कलाकार तर आहेच, शिवाय योगा प्रशिक्षक देखील आहे. साळगांवकर कुटुंबाच्या नसानसात कला असून अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेतून पदवी संपादन केलेला सिद्धार्थचा भाऊ सध्या कॅलिफोर्नियातील युएक्स डिझायनर या कंपनीत कार्यरत आहे. एकंदर सिद्धार्थ साळगांवकर यांच्या स्वरूपात बेळगावच्या आणखी एका युवकाने सातासमुद्रापार स्वतःसह आपल्या मूळ गावाचा आणि देशाच्या नावाचा झेंडा रोवण्यास सुरुवात केली आहे.