Monday, April 29, 2024

/

मनपा बैठकीत नगरसेवकांनी मांडल्या शहरातील समस्या! अधिकारी धारेवर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सोमवारी महानगरपालिका सभागृहात महापौर शोभा सोमनाचे यांच्या नेतृत्वाखाली प्रगती आढावा बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत शहरातील मूलभूत समस्यांवर लक्ष वेधले.

वीजवाहिन्या, पथदीप, कचरा समस्याच, गटारी, उद्यान, पाणी पुरवठा, स्मशान व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधांसाठी वापरण्यात येणाऱ्या निधीच्या खर्चाचा तपशील नगरसेवकांनी अधिकाऱ्यांकडे मागितला. प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी आणि सुविधा पुरविण्यासाठी किती खर्च केला याबाबत नगरसेवकांनी रोखठोख मुद्दा उपस्थित करत पालिका अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

सध्या शहरात कचऱ्याची समस्याच गंभीर बनली आहे. अनेक प्रभागात कचऱ्याची उचल होत नाही. काही ठिकाणी अनियमितपणे कचऱ्याची उचल होत आहे. कित्येक ठिकाणी कचरा उचल करणाऱ्या गाड्यांची कमतरता जाणवत आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या अखत्यारीत घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे १६० कचरा गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. यापैकी ८० कचऱ्याच्या गाड्या बिनकामाच्या उभ्या असल्याची तक्रार नगरसेवक रवी धोत्रे यांनी केली. यावर बोलताना महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी सांगितले, महामंडळाला देण्यात आलेल्या कचरा गाड्यांच्या चालकांची अडचण आहे. अनेकवेळा निविदा मागविण्यात आल्या. मात्र या पदासाठी अद्याप कोणीही आले नाही. कचरा गाडी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 belgaum

यावेळी नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संथगतीने सुरु असलेल्या कामाविषयीची तक्रार देखील मांडली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास सर्वच प्रभागात अपूर्ण कामे केली असून यासाठी कोट्यवधींचे अनुदान वाया गेल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदारीतून मुक्त करावे, अशी संतप्त मागणी काही नगरसेवकांनी केली.Corporator

पावसाळा तोंडावर आला असून या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत पुरवठा विभाग, आरोग्य खाते यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रभागवार निरीक्षण करून निदर्शनात येणाया समस्या पावसाळ्यापूर्वी सोडवाव्यात, याचप्रमाणे शहरातील नाल्यांची सफाई करून नागरिकांच्या आरोग्याशी होणार खेळ थांबवावा अशी मागणी सभागृहात करण्यात आली. यावेळी पथदीपांच्या एलईडी लाईटचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या बैठकीत सातत्याने अधिकारी वर्गाला धारेवर धरत मनपा अधिकाऱ्यांची वागणूक योग्य नसल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. यादरम्यान नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

या बैठकीला महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा नाईक, पालिका अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.