कर्नाटकात ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी यांनी रोड शो केला त्या सर्व जागांवर कर्नाटकात भाजप पराभूत झाला आहे त्यामुळे देशात आता मोदी शहा यांची जादू संपली आहे अशी टीका कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.
सांगलीच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर रविवारी सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिद्धरामय्या यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी कर्नाटकचे उद्योग मंत्री एम. बी. पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार सतेज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार मोहनराव कदम, आमदार जयंत असगावकर, आमदार आर. व्ही. देशपांडे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, आमदार प्रकाश हुक्केरी, आदी उपस्थित होते.
सिद्धरामय्या म्हणाले की केंद्रात लोकशाही व घटनेविरोधातले हे लोक आता सत्तेवर आहेत. त्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही टिकली तरच सामान्य माणूस सुखात राहील, अन्यथा या देशात लोकशाहीशिवाय जगणे मुश्कील होऊन जाईल.
कर्नाटकात आजपर्यंत कधीही भाजप जनतेतून निवडून आला नाही. ‘ऑपरेशन कमळ’च्या माध्यमातून आमदार विकत घेऊन ते सत्तेवर आले आहेत. अनेक बऱ्याच राज्यात हाच फाॅर्म्युला त्यांनी वापरला. त्यामुळे जनतेने त्यांना केव्हाच नाकारले आहे. महाराष्ट्रातील जनतेने सत्तेतील भाजपला दूर करावे असे आवाहन त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला केले.
कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून महाराष्ट्राच्या सीमा भागातील दुष्काळी गावांना पाणी देण्याबाबत लवकरच मंत्रिमंडळात चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
रामायणावरील ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बनविण्यामागे भाजपच आहे. याच चित्रपटात राम, हनुमान या देवतांचा मोठा अवमान करण्यात आला. महापुरुषांचा अवमान करणारे आता देवांचाही अवमान करीत आहेत, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.