Saturday, January 18, 2025

/

नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्रथम प्राधान्य : मंत्री सतीश जारकीहोळी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेच्या सभागृहात आज (बुधवारी) विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती आढावा बैठक बोलाविण्यात आली होती.

या बैठकीत स्मार्ट सिटी प्रकल्पाची पुरेशी अंमलबजावणी, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, आरोग्य सुविधा, कचरा विल्हेवाट, स्मशानभूमी विकास, पायाभूत सुविधांची तरतूद यासह सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे पार पाडावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्या. जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याची जबाबदारी आपली आहे. स्मार्ट सिटी, हेस्कॉमसह महत्त्वाच्या विभागांची स्वतंत्र बैठक होणार आहे.अधिकाऱ्यांना थोडा वेळ दिला जाईल. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांनी प्राधान्याने कामे करावीत, अशा सूचना जारकीहोळींनी दिल्या.

बेळगाव शहरात शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी एक कोटी रुपये देण्यात आले आहेत. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पुतळ्याचे बांधकाम तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना दिले. याचप्रमाणे क्रीडा संकुल, जलतरण तलाव व इतर कामे विहित मुदतीत पूर्ण करून सार्वजनिक वापरासाठी मोफत करण्यात यावीत, अशी सूचनाही जारकीहोळींनी केली. बैठकीत जनतेने मांडलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्यात यावे. चांगल्या सूचनांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केल्या.

या बैठकीत कचरा समस्येवर देखील लक्ष वेधण्यात आले. शहराच्या प्रवेश मार्गावरच कचऱ्याचे ढीग दिसत असून, ते नियमितपणे स्वच्छ करण्यासाठी पावले उचलावीत. व्यापारी व दुकानदारांनी रात्रीच्या वेळी ठरवून दिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणी कचरा टाकल्यास दंड वसूल करावा, गृहनिर्माण योजनेंतर्गत अर्ज करून कर्जाचा भरणा केला होता, मात्र आता काही कारणास्तव घरांची सुविधा नको असेल, त्यांनी कर्जाचे पैसे परत करण्यासाठी अर्ज केल्यास ते परत करण्याची कार्यवाही करण्यात यावी. एका महिन्यात त्यांना कर्जाचे पैसे परत करण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी दिले. काकतीतील काही भाग महापालिकेच्या अखत्यारीत येत असून कर भरूनही इमारत बांधकामाला परवानगी दिली जात नसल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले.

बेळगाव शहरातील चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्पाबाबत स्वतंत्र बैठक घेऊन कामांना गती देण्यासाठी व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असे जारकीहोळी म्हणाले. याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी शहरातील सर्व कूपनलिका पुनरुज्जीवित कराव्यात, आवश्यक असल्यास दुरुस्त कराव्यात, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी नियमानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात, कचरा विल्हेवाट लावणारे युनिट स्थापन करावेत, शहरात सर्वत्र एल.ई.डी. लाईट बसविण्याची व्यवस्था करावी असे ते म्हणाले. तसेच येत्या एक महिन्यात प्रभाग समिती स्थापन करण्यात येणार असून नागरी सेवकांची निवड यादी तयार असल्यास तातडीने नियुक्ती आदेश जारी करावेत, अशा सूचना त्यांनी पालिका आयुक्तांना दिल्या.Corp meeting

महिला व बालविकास, अपंग व ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनीदेखील शहरातील ज्वलंत समस्यांवर चर्चा करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी तातडीने कचरा उचल युनिटसाठी प्रस्ताव तयार करावा. यासाठी प्रशासन आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहरात सुरू झालेली सहा इंदिरा कॅन्टीन कशी चालवली जातील या प्रश्नावर भर देत बसस्थानकांसह गर्दीच्या ठिकाणी अधिकाधिक लोकांना सुविधा देण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा, असे निर्देश दिले.

उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ सेठ यांनी, मालमत्ता कर, बांधकाम परवानगी, सीसी देणे याबाबत जनतेकडून तक्रारी येत असून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश पालिका आयुक्तांना दिले. तसेच २४ तास पाणीपुरवठा योजना प्रकल्पाच्या कामाला होणारा विलंब आणि पाणीपुरवठा व्यवस्थेतील समस्या समजावून सांगितल्या. एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी आवश्यक पावले उचलण्याच्या सूचना देखील असिफ सेठ यांनी केल्या.

या बैठकीत दक्षिण विधानसभा मतदार संघात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत झालेल्या कामकाजाविषयी अनेक तक्रारी पुढे आल्या. याठिकाणी झालेल्या कामकाजात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही आजवर अनेकांनी केला असून आजच्या बैठकीत हाच विषय प्रामुख्याने चर्चेत आला. यावेळी विद्यमान लोकप्रतिनिधींनी आपल्या भागात झालेल्या कामकाजात गैरप्रकार झाल्याचे वाटत असल्यास कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करावी, आणि दोषींवर कारवाई करावी असे आव्हान दिले. आपल्याला जितके अनुदान मिळाले, त्यातून आपण चांगली विकासकामे केली असून हे सर्व कामकाज कायदेशीर झाल्याचा दावाही त्यांनी सभागृहात केला.

या बैठकीला आमदार, महापौर, उपमहापौर, नगरसेवक, नगरसेविका, विविध विभागांचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने विविध प्रभागातील नागरिकांची उपस्थित होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.