Saturday, July 27, 2024

/

मनपा बैठकीत नगरसेवक दुय्यम, पतींसह आप्तस्वकीय आघाडीवर

 belgaum

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बोलावलेली महापालिकेची विकास आढावा बैठक आज बुधवारी पार पडली. मात्र या बैठकीच्या अनुषंगाने नगरसेवकांच्या आप्तस्वकीयांचा महापालिका कारभारातील ढवळाढवळीचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मागील भाजप सरकारच्या कारकिर्दीतील बेळगाव महापालिकेच्या कारभारासंदर्भात अनेक तक्रारी असल्यामुळे विद्यमान काँग्रेस सरकार मधील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज बुधवारी महापालिकेची विकास आढावा आणि तक्रार निवारण बैठक बोलाविली होती. महापालिकेच्या मुख्य सभागृहात आयोजित सदर बैठकीस शहरातील सर्व नगरसेवक आणि नागरिकांना निमंत्रित करण्यात आले होते. या पद्धतीने पहिल्यांदाच महापालिका बैठकीला जनतेला प्रचार करण्यात आल्यामुळे सभागृह खचाखच भरले होते. बैठकीत महापालिका आणि बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या विरोधातील तक्रारी नागरिकांनी मांडल्या. बहुतांश नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांविरुद्ध आवाज उठवून त्यांची खरडपट्टी काढण्याबरोबरच अनेक वर्षे महापालिकेत तळ ठोकून असलेल्या या माजलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ अन्यत्र बदली करण्याची मागणी केली. मात्र हे सर्व घडत असताना नगरसेविकांचे पती म्हणजे महापालिकेचे जावई आणि नातलग यांची प्राधान्याने असलेली उपस्थिती सर्वांच्या चर्चेचा विषय झाली होती.

आजच्या बैठकीच्या आसन व्यवस्थेच्या ठिकाणी अग्रभागी नगरसेवक आणि नगरसेविकांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. तथापि याउलट चित्र सभागृहात पहावयास मिळाले. बैठकीप्रसंगी कांही मोजक्या नगरसेविकांचे पती वगळता व्यासपीठांसमोरील प्रमुख खुर्च्या महापालिकेचे जावई अर्थात नगरसेविकांचे पती आणि आप्तस्वकीयांनीच बळकावल्या होत्या. त्यामुळे कांही नगरसेवकांना तर आपल्या हक्काची खुर्ची मिळवण्यासाठी श्रम घ्यावे लागले. या खेदजनक प्रकाराची सभागृहातील नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होत होती. सदर प्रकार दुर्दैवी असल्यामुळे त्याच्या विरोधात कांही जाणकार नागरिकांनी पुढाकार घेतला असून महापालिकेचे संबंधित जावई आणि नगरसेवकांच्या आप्तस्वकीयांची महापालिका कारभारातील ढवळाढवळ थांबवावी अशी, विनंती महापालिका आयुक्तांकडे करण्याचा निर्णय घेतला आहे.Meeting corporation

त्याचप्रमाणे महापालिकेच्या जावयांना मनपा बैठकीस उपस्थित राहण्यास बंदी घालावी, अशी मागणी करण्याबाबत बहुतांश नगरसेवकांमध्ये चर्चा होताना दिसत होती. एकंदर आजच्या महापालिका बैठकीमुळे नगरसेविकांचे पती म्हणजे महापालिकेच्या जावयांचा महापालिका कारभारात किती सुळसुळाट झाला आहे याचे प्रत्यंतर आले. सदर प्रकाराचा सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र तीव्र निषेध केला जात आहे.

दरम्यान, भाजप सरकारच्या काळात कंटाळलेल्या जनतेने आता राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारच्या बेळगाव मधील नवनिर्वाचित मंत्री सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचून त्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी जोरदार मागणी केली. शेतकऱ्यांनी देखील आपल्या समस्या मांडल्या. तेंव्हा उभयमंत्र्यांनी प्रशासनाच्या मदतीने आम्ही तुमच्या समस्या त्वरेने सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू असे आश्वासन दिले. याबरोबरच उभय मंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगले खडसावून सांगत जनतेच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवून त्यांना दिलासा देण्याची सूचना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.