वीज बिलातील दर वाढ तात्काळ रद्द करण्यात यावी तसेच भूसंपादन करण्याद्वारे कित्तूर मार्गे बेळगाव -धारवाड रेल्वे मार्ग निर्मितीचे काम त्वरेने सुरू केले जावे, अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकाच्या (करवे) बेळगाव जिल्हा शाखेतर्फे एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
कर्नाटक रक्षण वेदिके बेळगाव जिल्हा अध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. विद्यमान काँग्रेस सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनहितार्थ पाच गॅरंटी योजनांचे आश्वासन दिले होते. आता सत्तेवर आल्यानंतर त्यांनी त्या आश्वासनाची पूर्तता करण्यास देखील सुरुवात केली आहे.
मात्र एकीकडे मोफत विजेची योजना जाहीर करताना दुसरीकडे सत्तेवर येताच या सरकारने अचानक वीज दरवाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेसह व्यापार, उद्योग वगैरे सर्व क्षेत्रातील मंडळी अडचणीत आली आहेत. सर्वसामान्य गोरगरिबांवर या दरवाढीच्या स्वरूपात आर्थिक संकट कोसळले आहे. तरी सदर वीज दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. तसेच बेळगाव ते धारवाड नव्या रेल्वे मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू करावे.
सध्या बेळगावच्या प्रवाशांना लोंढा मार्गे धारवाड असा प्रवास करावा लागत असल्यामुळे प्रवासाचे अंतर वाढण्याबरोबरच वेळही जास्त लागत आहे. तेंव्हा कित्तूर मार्गे बेळगाव -धारवाड असा नवा रेल्वे मार्ग झाल्यास वेळेची बचत होण्याबरोबरच प्रवासाचे अंतर देखील कमी होणार आहे. तेंव्हा सदर नव्या रेल्वे मार्गाच्या निर्मितीच्या दृष्टीने रेल्वे खात्याने भूसंपादनाचे कार्य हाती घेऊन हा मार्ग लवकरात लवकर तयार करावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यापूर्वी करवे जिल्हाध्यक्ष विनय गुडगनट्टी यांनी आपल्या मागण्यांबाबत प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली. याप्रसंगी करवे जिल्हा सचिव गणेश रोकडे, उपाध्यक्ष सुरेश गवन्नवर तसेच अन्य पदाधिकारी व करवे कार्यकर्ते उपस्थित होते