सरकारने केलेल्या अवास्तव आणि अन्यायी वीज बिल दरवाढीच्या निषेधार्थ बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (बीसीसीआय) नेतृत्वाखाली विविध संघटनांच्यावतीने आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चासह इलेक्ट्रिक दुचाकीची अंत्ययात्रा काढून वीज दरवाढ तात्काळ मागे घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
वीज दरवाढीच्या विरोधात बीसीसीआयच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या आजच्या मोर्चाला राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून प्रारंभ झाला. बेळगाव शहर आणि परिसरात 9 हून अधिक औद्योगिक वसाहती आहेत. या वसाहतींमधील बहुसंख्य कामगारांसह व्यापारी संघटना, लॉन्ड्री असोसिएशन वगैरे इतर अन्य संघटनांसह सर्वसामान्य नागरिकांनी आजच्या मोर्चात भाग घेतला होता. त्यामुळे चन्नम्मा सर्कल गर्दीने फुलून गेले होते. उद्योजक, व्यापारी, कामगार, सर्वसामान्य नागरिक अशा हजारो लोकांचा समावेश असणारा हा विराट मोर्चा आणि मोर्चातील इलेक्ट्रिक दुचाकीची अंत्ययात्रा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. मोर्चादरम्यान वुई वॉन्ट जस्टिस, बेके बेकू न्याया बेकू, अन्याय वीज दर वाढ मागे घ्या आदी घोषणा देऊन मोर्चेकर्यांनी चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा मार्ग दणाणून सोडला होता.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाची सांगता झाली त्यानंतर बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सरकारच्या नावे वीज दरवाढ तात्काळ मागे घ्यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना बीसीसीआयचे माजी अध्यक्ष रोहन जुवळी यांनी सध्याच्या अवास्तव वीज दर वाढीचा तीव्र निषेध केला. तसेच यापूर्वी आम्ही विनंती करण्याबरोबरच त्यासाठी मुदत देऊन देखील वीज दरवाढ मागे न घेण्यात आल्यामुळे आजचा हा मोर्चा काढण्यात आला आहे असे सांगितले. तसेच वीज बिलामध्ये जी 30 ते 60 टक्के तर वाढ करण्यात आली आहे ती आम्ही भरणार नाही. कारण आमची आर्थिक परिस्थिती तितकी सक्षम नाही असे स्पष्ट करून अन्याय वीज दरवाढ तात्काळ मागे घेण्यात आली नाही तर राज्यव्यापी बंद पुकारून आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
राजकीय नेते व उद्योजक शंकरगौडा पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सदर वीज दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. तेंव्हा ती त्वरित मागे घेतली जावी. अन्यथा आज जे आम्ही प्रतिकात्मक आंदोलन करत आहोत ते भविष्यात उग्र स्वरूपात करावे लागेल आणि त्यावेळी समस्त जनता देखील रस्त्यावर उतरेल असे सांगितले.
आम्ही स्वबळावर आमचे उद्योगधंदे उभे केले आहेत. बेळगावात जवळपास 32 हजार लघुउद्योजक असून जे जवळपास लाख -दीड लाख लोकांना रोजगार उपलब्ध करत आहेत. सध्या जूनमध्ये आम्हाला दिलेल्या मे महिन्याच्या वीज बिलात 30 ते 70 टक्के दरवाढ करण्यात आली आहे ही अवास्तव दरवाढ अन्याय आणि असहनिय आहे. आतापर्यंत वर्षभर 5 ते 10 टक्के वाढ व्हायची आम्ही ती सहन करत होतो. मात्र आता ही दरवाढ सहन करणे शक्य नाही. यामुळे लहान उद्योगधंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दुर्दैवाने तसे झाल्यास बेळगावातील लाख -दीड लाख लोक रस्त्यावर येणार आहेत. वीज दरवाढीमुळे व्यापारी, हॉटेल व्यवसायिक आदींसह सर्वसामान्य जनतेवर आर्थिक संकट आले आहे. याची गंभीर दखल सरकारने घेतली पाहिजे आम्ही कोणत्याही सरकारच्या विरोधात नाही. मात्र जे सरकार अस्तित्वात आहे त्यांनी निर्णय घेतला पाहिजे.
आम्हाला ‘मग तुम्ही महाराष्ट्रात जाणार का?’ असे विचारण्यात आले आहे. महाराष्ट्र हा एकच प्रदेश नाही तर भारतात असे अनेक प्रदेश आहेत जे उद्योजकांना चांगल्या सवलती देतात हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे. आम्ही कर्नाटकात जन्मलो आहोत. कर्नाटकाचा चांगला विकास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. त्यासाठी उत्पादन क्षमता वाढली पाहिजे आणि त्याकरिता सरकारने सहकार्य केले पाहिजे. जर आम्हाला आवश्यक चांगल्या सुविधा पुरविण्यात आल्या तर आम्ही कर्नाटकला उद्योगधंद्यात देशातील अव्वल स्थानावर नेऊन ठेवू. यासाठी सरकारची मदत आवश्यक आहे. मात्र सध्याचे विज बिल पाहता सरकारची तशी मानसिकता दिसत नाही, असे अन्य एका उद्योजकाने खेदाने सांगितले.