Saturday, November 9, 2024

/

बंद यशस्वी!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : वीजदरवाढीविरोधात आज बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तसेच शहरातील विविध औद्योगिक व्यापारी संघटनांच्यावतीने बंद ची हाक दिली होती. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये आज हा बंद यशस्वीरीत्या पार पडला असून सकाळपासूनच सर्वच व्यावसायिकांनी आपापली आस्थापने, व्यवसाय बंद ठेवून बंदला पाठिंबा देत सरकारविरोधात निषेध व्यक्त केला.

बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडोंच्या संख्येने निषेध मोर्चा काढण्यात आला. या मिरवणुकीत अनोख्या पद्धतीने बॅटरी बाईकची शवयात्रा काढून वीजदरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. पेट्रोल दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झालेली दरवाढ आणि त्यातच भर म्हणून वीजदरवाढ हि सर्वसामान्यांना परवडणारी नाही. यामुळे बॅटरी बाईकवर देखील आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची उपहासात्मक टीका यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

बेळगावमधील बहुतांशी भागातील व्यावसायिक, उद्योजकांनी आपापले उद्योग – व्यवसाय बंद ठेवून आजचा बंद यशस्वी केला. बेळगावसह धारवाड, बिदर, विजापूर, उत्तर कन्नड, हुबळी, विजयनगर, बळ्ळारी, हावेरी यासह ११ जिल्ह्यातील व्यवसाय स्तब्ध झाले होते. तर बेंगळुरू, दावणगेरे, कोडगू, दक्षिण कन्नड यासह २० जिल्ह्यात बंदला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाले नाही.

बेळगावमध्ये आज बाजारपेठेतही शुकशुकाट दिसून आला. मार्केट यार्ड मधील व्यापारी बंधूंनी देखील बंदला पाठिंबा देत आपले व्यवसाय बंद ठेवले होते. आज बेळगाव शहरात काढण्यात आलेल्या निषेध मिरवणुकीत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वीजदरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. निषेध मोर्चासह विविध ठिकाणी रास्तारोको करून निषेध नोंदविण्यात आला. आजच्या बंदला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवत वीजदरवाढ मागे घेण्याची मागणी उचलून धरली. बेळगावमधील उद्यमबाग, मच्छे, मजगाव, अनगोळ, नावगे, काकती, होनगा, ऑटोनगर येथील औद्योगिक वसाहती व व्यापारी पेठा बंद ठेवून उद्योजक व त्यांचे कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते.

मे महिन्याच्या विद्युत बिलामध्ये ३० ते ७० टक्के वाढ करण्यात आली. ही भरमसाट दरवाढ उद्योजकांसह नागरिकांना डोकेदुखीची ठरत आहे. यामुळे उद्योग क्षेत्राचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे सरकारने ही वाढीव दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी उद्योजकांनी केली असून आज वीजदरवाढ मागे घेण्यात यावी संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.