बेळगाव लाईव्ह : राज्यातील जनतेच्या आशीर्वादाने सत्ता मिळविलेल्या काँग्रेसने केंद्राविरोधात आंदोलन करणे निषेधार्थ असल्याची टीका राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली.
मंगळवारी कन्नड साहित्य भवन येथे बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि टीका केली. काँग्रेसने जाहीर केलेल्या हमी योजना या कोणत्याही पूर्वनियोजनाविनाच जाहीर करण्यात आल्या. केंद्राकडून अन्नसुरक्षा योजने अंतर्गत जनतेला प्रत्येकी ५ किलो तांदुळ देण्यात येतो.
त्याच दराने एपीएल कार्ड धारकांनाही तांदूळ पुरविण्यात येतो. आजपर्यंत भाजपने ८० कोटी लोकांना तांदळाचा पुरवठा केला. तर दुसरीकडे काँग्रेस सरकारच्या वतीने अन्न भाग्य योजने अंतर्गत तांदूळ देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र अद्यापही तांदूळ वितरण करण्यात आले नाही. गोदामात तांदूळ ठेवून काँग्रेसने जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत.
प्रारंभी २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन देऊन आता नवनवीन अटी घालण्यात येत आहेत. हा कोणता न्याय आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवाय वीजदरवाढ रोखणे हेदेखील सरकारच्या हातात असल्याचे कडाडी म्हणाले.
काँग्रेस सरकार शेतकऱ्यांचे आधार क्रमांक आरआर क्रमांकाशी जोडण्यास सांगून यामध्येही राजकारण करत आहे. शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचे कडाडी म्हणाले. महिलांना शक्ती योजने अंतर्गत मोफत बसप्रवासाची सुविधा देण्यात येत आहे हे स्वागतार्ह आहे.. मात्र काही हमी योजनांची अम्मलबजावणी करणे शक्य नसल्याचे कडाडी यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार आणि बेळगाव ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनीही काँग्रेसवर टीका करत काँग्रेसच्या खोटेपणावर देशवासीयांनी पीएचडी करावी, काँग्रेस हि एक नाटक कंपनी आहे. त्यांना मोठा पुरस्कार दिला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडविली.यावेळी भाजप शहर घटक प्रधान सचिव मुरुगेन्द्र गौडा पाटील, दादागौड बिरादार आदी उपस्थित होते.